नगर मध्ये मसाज, स्पा सेंटरच्या नावाखाली सुरु होता भलताच ‘कुटाणा’, पोलिसांची मोठी कारवाई


अहिल्यानगर - नगरमध्ये मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा पोलिस अधिक्षक कार्यालयातील अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने पर्दाफाश करीत ५ महिलांची सुटका केली आहे. या प्रकरणी कुंटणखाना चालकासह दोघांवर तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सावेडीत नगर मनमाड रोड लगत असलेल्या साई मिडास इमारतीत ११ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ च्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.

साई मिडास या इमारतीत अॅक्युम मसाज पार्लर व स्पा सेंटर येथे मसाज ऐवजी वेश्याव्यवसाय सुरु असल्याची गोपनीय माहिती अप्पर पोलिस अधिक्षक वैभव कालुबर्मे यांना मिळाली होती. याबाबत कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे पोलिस निरीक्षक रविंद्र देशमुख यांना दिल्या होत्या. त्यानुसार पो.नि. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार शकील शेख, महिला पो.हे.कॉ. अनिता पवार, अर्चना काळे, छाया रांधवन यांच्या पथकाने ११ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ च्या सुमारास त्या ठिकाणी छापा टाकला.

त्यावेळी तेथे वेश्याव्यवसाय सुरु असल्याचे समोर आले. या पथकाने तेथे असलेल्या ५ महिलांना ताब्यात घेतले. हे सेंटर चालवणारा अनिकेत अशोक बचाटे (रा.कुंभारगाव ता.करमाळा, जि. सोलापूर) याला व एका ग्राहकाला अटक केली.

या दोघांच्या विरुद्ध महिला पो.हे.कॉ. छाया रांधवन यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादी वरून पोलिसांनी स्रिया व मुली यांचे अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा १९५६ चे कलम ३,,,, ८ नुसार गुन्हा दाखल केला आहे.


 

0/Post a Comment/Comments