राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुका जाहीर



मुंबई - आरक्षणाची मर्यादा ओलांडल्याने रखडलेल्या राज्यातील जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा बिगुल अखेर आज वाजला. राज्य निवडणूक आयोगाकडून पहिल्या टप्प्यात १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. उर्वरित झेडपी व पंचायत समित्यांच्या निवडणुका सुप्रीम कोर्टाच्या निकालावर अवलंबून असतील. या निवडणुका दुसऱ्या टप्प्यात होतील.

निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या. जिल्हाधिकाऱ्यांकडून १६ जानेवारीला अधिसूचना काढली जाईल. त्यानुसार ५ फेब्रुवारीला मतदान तर 7 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. इच्छूकांना १६ जानेवारी या तारखेपासून उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. त्यासाठीची अंतिम मुदत २१ जानेवारी ही असेल. २२ जानेवारी या दिवशी छाननी होईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी २७ जानेवारीपर्यंत असणार आहे. तर त्यानंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल. निवडणुका पारदर्शक व व्यवस्थितपणे पार पडाव्यात यासाठी आयोगाची यंत्रणा सज्ज असल्याची माहिती वाघमारे यांनी दिली.

राज्यातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव व लातूर या १२ जिल्हा परिषदांच्या निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये एकूण ७३१ सदस्य आहेत. तर १२५ पंचायत समित्यांमध्ये १ हजार ४६२ जागांसाठी मतदान होणार आहे. उमेदवारी अर्ज ऑफलाईन दाखल करण्याची सुविधा असेल, असे वाघमारे यांनी सांगितले.

निवडणूक कार्य्रकम

उमेवदवारी अर्ज - १६ ते २१ जानेवारी
छाननी  २२ जानेवारी
माघार २७ जानेवारी
अंतिम उमेदवारी यादी २७ जानेवारी
मतदान ५ फेब्रुवारी
मतमोजणी ७ फेब्रुवारी


 

0/Post a Comment/Comments