अहिल्यानगर
- स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) मुख्य शाखा, अहिल्यानगर
येथे तब्बल 3 कोटी 77 लाख 1 हजार 619 रूपयांच्या अपहाराचा गंभीर प्रकार उघडकीस
आला असून, बँकेतीलच सिनियर असोसिएटने आपल्या पदाचा गैरवापर
करत ही आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी भिंगार कॅम्प
पोलीस ठाण्यात तिघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून बँकिंग क्षेत्रात खळबळ
उडाली आहे.
या
प्रकरणी एसबीआय मुख्य शाखेच्या शाखा प्रमुख भूमिजा साकेत रावत (वय 43, मुळ रा. देहराडून, उत्तराखंड, हल्ली रा. सोलापूर रस्ता, अहिल्यानगर) यांनी
फिर्याद दाखल केली आहे. वैभव सुभाष रत्नपारखी (वय 42, रा. अनुगंगा निवास, गणेशनगर, नागापूर), राहुल प्रकाश शिंदे व श्वेता प्रकाश शिंदे उर्फ श्वेता वैभव
रत्नपारखी (दोघे रा. दत्तनगर, एकविरा चौक, सावेडी) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे
आहेत. भूमिजा रावत या 28 एप्रिल 2025 पासून अहिल्यानगरच्या मुख्य शाखेत शाखा प्रमुख म्हणून
कार्यरत आहेत. त्यांना एसबीआयकडे असलेल्या असामान्य आर्थिक व्यवहार तपासणी
सॉफ्टवेअरमध्ये मे 2025 मध्ये संशयास्पद व्यवहार आढळून आले.
तपासादरम्यान
वैभव सुभाष रत्नपारखी हा कर्मचारी या व्यवहारांशी संबंधित असल्याचे निदर्शनास आले.
तो सन 2009 ते 2018 आणि
पुन्हा 1 जून 2021 ते 13 मे 2025 या कालावधीत मुदतठेव व गुंतवणूक विभागात
सिनियर असोसिएट म्हणून कार्यरत होता. या विभागात ग्राहकांच्या मुदतठेवी स्वीकारणे,
गुंतवणूक योजनांचे व्यवहार, मुदतपूर्ती
झालेल्या ठेवी परत देणे व त्यांची संगणकीय नोंद ठेवण्याची जबाबदारी संबंधित
कर्मचार्यावर असते.
वैभव
रत्नपारखी याने ‘प्रबंधक’ या नावाने असलेल्या 22 मुदतठेव पावत्या, ‘जिल्हा ग्राहक मंच’ या नावाने
असलेल्या 53 मुदतठेव पावत्या बेकायदेशीरपणे बंद केल्या. त्या
ठेवींमधील रक्कम स्वतःच्या फायद्यासाठी वळवण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. राहुल
शिंदे याच्या खात्याशी वैभव रत्नपारखी याचा मोबाईल नंबर लिंक असल्याचेही तपासात
आढळले आहे. वैभव रत्नपारखी याने बनावट बँकर्स चेकचा वापर केला, तसेच खोटी व बनावट कागदपत्रे तयार केली, संगणकीय
रेकॉर्डमध्ये फेरफार केला, बँकर्स चेक बेकायदेशीररीत्या तयार
केले, वरिष्ठ अधिकार्यांची दिशाभूल करून व्यवहार मंजूर करून
घेण्यासाठी इंटरनेट बँकिंग व यूपीआय सुविधेचा गैरवापर करण्यात आला असल्याचे
फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
वैभव
रत्नपारखी याने सन 2009 ते 2018 व 2021 ते 2025 या कालावधीत
बँकेचा कर्मचारी म्हणून मिळालेल्या अधिकारांचा गैरवापर करून, नातेवाईकांशी संगनमत करून सरकारी बँकेच्या निधीचा 3.77 कोटी रूपयांचा अपहार केल्याचा ठपका संशयित आरोपींवर ठेवण्यात आला आहे.
आरोपींविरोधात फसवणूक, विश्वासघात, बनावट
कागदपत्रे तयार करणे आदी कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सहायक पोलीस
निरीक्षक जगदीश मुलगीर करीत आहेत.
मेहुणा व पत्नीच्या खात्यात रक्कम वर्ग
अपहारातील रक्कम वैभव रत्नपारखी याचा मेहुणा राहुल प्रकाश शिंदे
याच्या एसबीआय खात्यात 82 व्यवहारांव्दारे सुमारे 3 कोटी 36 लाख 47 हजार 158
रूपये वर्ग करण्यात आले. तसेच पत्नी श्वेता प्रकाश शिंदे उर्फ
श्वेता वैभव रत्नपारखी यांच्या खात्यात 5 व्यवहारांतून 40
लाख 54 हजार 461 रूपये
वर्ग केल्याचे समोर आले आहे.
पुरावे नष्ट केले
अपहार उघडकीस येऊ नये यासाठी वैभव रत्नपारखी याने संगणकीय रेकॉर्ड व
कागदपत्रे नष्ट केल्याचा गंभीर आरोपही फिर्यादीत करण्यात आला आहे. संशय
वाढल्यानंतर वैभव रत्नपारखी याच्याशी बँकेने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता
त्याचा मोबाईल बंद लागत होता आणि तो बँकेतही गैरहजर राहिला. अखेर बँकेने त्याला
निलंबित करून ई-मेलव्दारे नोटीस बजावली.

Post a Comment