अहिल्यानगर - गुगलवर लिंकला रेटिंग देऊन नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून सायबर भामट्यांनी एका शिक्षिकेची तब्बल ५ लाख ४५ हजार ९६८ रुपयांची ऑनलाईन आर्थिक फसवणूक केल्याची घटना ३ जानेवारी ते ५ जानेवारी या कालावधीत घडली आहे. याप्रकरणी ३ फेब्रुवारीला नगरच्या सायबर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत आगरकर मळा परिसरात राहणाऱ्या ३९ वर्षीय शिक्षिकेने फिर्याद दिली आहे. फिर्यादी शिक्षिकेला टेलिग्राम आयडीवरून संपर्क करण्यात आला होता. आरोपींनी त्यांना गुगलवर लिंकला रेटिंग देण्याचे टास्क दिले आणि त्यातून मोठा नफा मिळेल असे आमिष दाखवले. सुरुवातीला विश्वास संपादन केल्यानंतर, टास्कमधून बाहेर पडण्यासाठी काही स्टेप्स फॉलो करण्यास सांगण्यात आले. मात्र, या स्टेप्स चुकीच्या असल्याचे सांगून तांत्रिक कारणास्तव टेलिग्राम ग्रुपमधील सदस्यांची बँक खाती फ्रीज झाल्याची भीती आरोपींनी दाखवली.
फ्रीज झालेली खाती पुन्हा सुरू करण्यासाठी आणि गुंतवलेले पैसे परत मिळवण्यासाठी फिर्यादीला आणखी पैसे भरण्यास भाग पाडले गेले. अशा प्रकारे वेळोवेळी एकूण ५ लाख ४५ हजार ९६८ रुपये बँक खात्यात पाठविण्यास सांगून त्यांची फसवणूक करण्यात आली. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडितेने सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी टेलिग्राम आयडी धारक आणि संबंधित बँक खातेधारकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सायबर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सागर ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. नागरिकांनी अशा कोणत्याही अनोळखी लिंक किंवा टास्कला बळी पडू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Post a Comment