नगर तालुक्यात गावच्या यात्रोत्सवात जुन्या भांडणाचा वाद उफाळला, तरुणावर हल्ला


 

नगर तालुका (प्रतिनिधी) - नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथे यात्रा उत्सवादरम्यान जुन्या भांडणाची कुरापत काढून एका तरुणावर विटेने जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे. याप्रप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात आरोपी घनश्याम संतोष जाधव  (रा. चिचोंडी पाटील, ता.नगर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत आदित्य कैलास पाडेकर (वय २४, रा. चिचोंडी पाटील, ता.नगर) यांनी फिर्याद दिली आहे. आदित्य हे गावातील यात्रेसाठी गेले असता, त्या ठिकाणी आरोपी घनश्याम जाधव हा दारूच्या नशेत आला. त्याने आदित्य यांना जुन्या भांडणाचे कारणावरून अश्लील शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. आदित्य यांनी शिवीगाळ करण्यास विरोध केला असता, "तू मला पाठीमागे शिवीगाळ आणि मारहाण केली होती," असे म्हणून आरोपीने संताप व्यक्त केला.

या रागातून घनश्यामने तेथे पडलेली वीट उचलून आदित्य यांच्या डोक्यात जोरात मारली. या हल्ल्यात आदित्य यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन रक्तस्राव झाला. तसेच 'तू कोठेही भेट, तुला जिवंत मारून टाकील' अशी धमकीही आरोपीने दिली. या घटनेनंतर जखमी आदित्य यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवला असून अधिक तपास महिला पो.ना. गायत्री धनवडे करत आहेत.

0/Post a Comment/Comments