अहिल्यानगर - भिंगार जवळील वडारवाडी ग्रामपंचायत कार्यालयातच सफाई कामगार महिलेचा डोक्यात लोखंडी वस्तूने प्रहार करत निर्घृण खून करण्यात आल्याची घटना २७ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास घडली. अनिता देविदास आळकुटे (वय ४२) असे मयत महिलेचे नाव आहे. या प्रकरणी संशयित आरोपी संतोष नाना धोत्रे (वय ४९) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
वडारवाडी ग्रामपंचायतीवर सध्या प्रशासक आहे. या ग्रामपंचायतीत सफाई कामगार म्हणून अनिता आळकुटे ही महिला काम करत होती. तर ग्रामपंचायतच्या कचरा संकलन करणाऱ्या घंटागाडीवर संतोष धोत्रे हा चालक म्हणून काम करत होता. २७ ऑक्टोबर रोजी सकाळी या दोघांमध्ये कुठल्यातरी कारणावरून वाद झाले. या वादात संतोष धोत्रे याने ग्रामपंचायत कार्यालयातच पिण्याचे पाणी पुरवठा करण्यासाठी सोडण्याचा लोखंडी हँडल तिच्या डोक्यात मारला. त्यामुळे ती गंभीर जखमी होवून रक्ताच्या थारोळ्यात पडली. या घटनेची माहिती मिळताच भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याच्या स.पो.नि. तेजश्री थोरात आणि पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या महिलेला उपचारासाठी तात्काळ जिल्हा रुग्णालय या ठिकाणी हलवण्यात आले. मात्र रुग्णालयात पोहचण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने न्यायवैद्यकीय पथकाला घटनास्थळी बोलावून घेतले आहे.न्यायवैद्यकीय पथकाच्या माध्यमातून सध्या घटनास्थळावरील जागेचा सखोल पंचनामा करण्याचे काम सुरू करण्यात आले.
या गुन्ह्यामध्ये संशयित आरोपी असणाऱ्या संतोष धोत्रे याला भिंगार कॅम्प पोलिसांनी तातडीने आपल्या ताब्यात घेतले आहे. प्राथमिक चर्चेनुसार चारित्र्याच्या संशयावरून किंवा वैयक्तिक वादातून हा खून झाला असावा अशी चर्चा आहे.मात्र या हत्येचे नेमके आणि अचूक कारण काय असावे हे अद्याप पोलिसांकडून अधिकृतपणे स्पष्ट झालेले नाही.घटनेची माहिती वाऱ्यासारख्या पसरताच वडारवाडी ग्रामपंचायत कार्यालयाच्या परिसरामध्ये नागरिकांनी एकच गर्दी केली होती.

Post a Comment