अहिल्यानगर - भिंगार परिसरातील जामखेड रोडवर असलेल्या लष्करी वसाहतीत वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून एका लष्करी जवानाने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना २८ सप्टेंबर रोजी सकाळी उघडकीस आली आहे. आप्पाराव महादेव ठोंबरे (वय ३४, रा. क्वार्टर नं.१४३/२, क्वीन्स लाईन, आर्मी हॉस्पिटल मागे, जामखेड रोड, मूळ रा. दहिफळ वडमावली, ता. केज, जि.बीड) असे मृत जवानाचे नाव आहे. याप्रकरणी मृत जवानाच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून दोन सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत आप्पाराव महादेव ठोंबरे हे अहिल्यानगरमधील आर्मी एरियात कार्यरत होते. आरोपी नायब सुभेदार निलकमल आणि हवालदार सचिन खेडकर हे त्यांना कामाच्या ठिकाणी वारंवार मानसिक त्रास देत होते. आरोपींनी मयताच्या पत्नीविषयी अयोग्य उद्गार काढून तिला आपल्याकडे पाठवण्यास सांगितले होते. तसेच, नोकरीत व्यवस्थित काम करू देणार नाही, वरिष्ठांकडे तक्रार करून अडचणीत आणू आणि हवी ती रजा मिळू देणार नाही, अशी धमकीही दिली होती.
या सततच्या अपमानास्पद वागणुकीला आणि मानसिक त्रासाला कंटाळून आप्पाराव ठोंबरे यांनी आर्मी एरियातील क्वार्टरमध्ये २८ सप्टेंबर रोजी सकाळी गळफास घेत आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
या प्रकरणी मयत जवान ठोंबरे यांच्या पत्नी लक्ष्मी आप्पाराव ठोंबरे यांनी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी नायब सुभेदार निलकमल आणि हवालदार सचिन खेडकर यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १०८, ३५१(२) आणि ३(५) नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश देशमुख करत आहेत. सैन्य दलातील या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून पोलीस प्रशासनाकडून कसून तपास सुरू आहे.

Post a Comment