मेव्हण्याचा खून करणारा ‘दाजी’ अखेर पोलिसांच्या जाळ्यात, लय पळाला पण शेवटी सापडलाच ...


अहिल्यानगर - नगर तालुक्यातील पिंपळगाव कौडा येथे लोखंडी कत्तीने वार करत तरुणाचा खुन करून पसार झालेल्या आरोपीला कल्याण रेल्वे स्टेशन परिसरातून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. हरीष गुलाब काळे (वय ३०, रा. पिंपळगाव कौडा, ता. नगर) असे पकडलेल्या आरोपीचे नाव आहे. 

या गुन्ह्याची हकीगत अशी की, १९ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास फिर्यादी विक्रम रोहिदास भोसले (वय ४०, रा. पिंपळगाव कौडा, ता. नगर) यांचे नातेवाईक हरीष गुलाब काळे याच्या राहत्या घरी भांडण सुरू होते. हे भांडण सोडवण्यासाठी फिर्यादी व त्यांचा भाऊ किरण रोहिदास भोसले हे गेले होते. त्यावेळी हरीष गुलाब काळे याने भांडण सोडवण्याच्या कारणावरून किरण रोहिदास भोसले याच्या तोंडावर, छातीवर व पोटावर लोखंडी कत्तीने वार करून खून केला व तो पसार झाला होता. या प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिेतेच्या कलम १०३(१), ३५२, ३५१(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्ह्याची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी स्थानिक गुन्हे शाखेस तपासाचे व आरोपीचा शोध घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी पोलीस अंमलदार फुरकान शेख, शामसुंदर जाधव, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, रोहित मिसाळ, प्रताप देवकाते, दिपक जाधव व अरूण मोरे अशांचे पथक तयार करून गुन्हयातील आरोपीचा शोध घेणेबाबत सुचना व मार्गदर्शन करून पथकास रवाना केले.

गुन्हा घडल्या पासून फरार असलेला आरोपी श्रीगोंदा, दौंड, पुणे व मुंबई परिसरात सतत आपले ठिकाण बदलत होता. दरम्यान, २३ सप्टेंबर रोजी आरोपी हरीष गुलाब काळे हा कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात असल्याची गोपनीय माहिती पथकास मिळाली. या माहितीच्या आधारे पथकाने कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात सापळा रचून हरीष काळे ताब्यात घेतले. ताब्यातील आरोपीस पुढील तपासासाठी नगर तालुका पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.


 

0/Post a Comment/Comments