नगर कल्याण महामार्गावर भरधाव पिकअपच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण ठार


अहिल्यानगर - नगर कल्याण महामार्गावर पारनेर तालुक्यातील कर्जुले हर्या शिवारामध्ये भरधाव पिकअप गाडीने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची भीषण घटना २१ सप्टेंबर रोजी दुपारी सव्वा एक वाजण्याच्या सुमारास घडली आहे. साहिल कैलास इंगावले (वय २१, रा. म्हसोबा झाप, ता. पारनेर) असे मयत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

मयत साहिल कैलास इंगावले हा तरुण आपली हिरो स्प्लेंडर मोटारसायकल (क्र. एमएच १४ जेके ७४९९) स्वतः चालवत नगर कल्याण महामार्गावरून जात होता. कर्जुले हर्या गावाचे शिवारामध्ये बाबा का ढाबा हॉटेलसमोर अहिल्यानगरकडे जाणाऱ्या महिंद्रा मॅक्स पिकअप गाडीचा (क्र. एमएच १६ डीपी १८१२) चालक दिनेश पंढरीनाथ खोडदे (रा. भनगडवाडी, ता. पारनेर) याने आपली गाडी भरधाव वेगात चालवून विरुद्ध बाजूने येऊन दुचाकीला जोरदार धडक दिली.  

या अपघातात साहिल यास गंभीर दुखापत होऊन त्याचा मृत्यू झाला तसेच दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे. अपघात घडल्यानंतर चालक कोणतीही मदत न करता घटनास्थळावरून पळून गेला. या प्रकरणी बाळासाहेब छगन झावरे (रा.टाकळी ढोकेश्वर, ता. पारनेर) यांच्या फिर्यादी वरून पिकअप चालक दिनेश खोडदे याच्या विरुद्ध पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

0/Post a Comment/Comments