पाथर्डी - हॉटेलवरील
नोकरावर हाफ मर्डर सारख्या गंभीर गुन्ह्याची नोंद करण्याची भीती दाखवून हॉटेल
मालकाला ५ लाखांची लाच मागणाऱ्या पाथर्डी पोलीस ठाण्यातील पोलिसाला लाचलुचपत प्रतिबंधक
विभागाच्या नाशिक येथील पथकाने सापळा लावत १ लाखांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले
आहे. विनोद शिवाजी मासाळकर (वय ३७, नेमणूक
- पाथर्डी पोलीस स्टेशन, जि. अहिल्यानगर) असे लाचखोर पोलीस
अंमलदाराचे नाव आहे.
याप्रकरणी मिळालेली सविस्तर माहिती अशी की, तक्रारदार
यांच्या हॉटेलवर काम करणारा नोकर मोटारसायकलवरून पाथर्डी गावातून जात असताना एका
अनोळखी ट्रक चालकासोबत गाडी कट मारण्याच्या कारणावरून त्यांची आपापसात मारामारी
झाली होती. या घटनेनंतर पाथर्डी पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार विनोद मासाळकर याने
तक्रारदार यांना गाठून, तुमच्या हॉटेलवरील नोकरावर हाफ मर्डर
व रॉबरीचा गंभीर गुन्हा दाखल करतो, अशी भीती दाखवली. त्यानंतर तक्रारदार
हे पोलीस ठाण्यात गेले असता, सदर गंभीर गुन्हा दाखल न करता
वरिष्ठांना सांगून सौम्य स्वरूपाचा मारामारीचा गुन्हा दाखल करतो आणि लवकरच जामीन
मंजूर करून तपासात मदत करतो, असे प्रलोभन दाखवून मासाळकर याने ५
लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली.
तक्रारदार यांना पोलीस कर्मचाऱ्यास लाच देण्याची इच्छा
नसल्याने त्यांनी १८ सप्टेंबर २०२६ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक
युनिटकडे रीतसर तक्रार दिली. या तक्रारीच्या अनुषंगाने १९ सप्टेंबर २०२६ रोजी
पंचांसमक्ष लाचेच्या मागणीची पडताळणी करण्यात आली. पडताळणीदरम्यान आरोपी विनोद
मासाळकर याने तडजोडीअंती २ लाख १५ हजार रुपयांची लाच स्वीकारण्याचे मान्य केले.
त्यानुसार १९ सप्टेंबर २०२६ रोजी सापळा रचण्यात आला असता, आरोपी
मासाळकर याने तडजोडीतील लाचेच्या रकमेपैकी १ लाख रुपयांची रक्कम तक्रारदाराकडून
पंचांसमक्ष स्विकारली. या कारवाईदरम्यान लाचलुचपत पथकाने आरोपीच्या अंगझडतीत विवो कंपनीचा
मोबाईल, १५
हजार १३० रोख रक्कम आणि एटीएम कार्ड जप्त केले आहे.
याप्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध
अधिनियम १९८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या यशस्वी कारवाईत लाचलुचपत
प्रतिबंधक विभाग, नाशिकचे पोलीस उपअधीक्षक संतोष पैलकर, पोलीस
हवालदार दिनेश खैरनार, अविनाश पवार आणि पोलीस शिपाई योगेश
शिंदे यांनी सहभाग घेतला असून, या गुन्ह्याचा पुढील तपास अहिल्यानगर
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस निरीक्षक श्रीमती सविता तांबे करत आहेत.
दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस
अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक प्रदीप मैराळे आणि
कविता फडतरे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही शासकीय अधिकारी किंवा
कर्मचाऱ्याने शासकीय काम करण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ लाचलुचपत
प्रतिबंधक विभाग, नाशिक यांच्याशी संपर्क साधावा.
यासाठी ०२५३-२५७५६२८ हा दूरध्वनी क्रमांक व १०६४ हा टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून
देण्यात आला आहे.

Post a Comment