अहिल्यानगर - ठेवीदारांनी विश्वासाने ठेवलेल्या ठेवींच्या रकमांचा अपहार केल्या प्रकरणी नाशिक मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या संपदा पतसंस्थेच्या संचालक मंडळाच्या शासनाने जप्त केलेल्या मालमत्तांच्या लिलावाद्वारे विक्रीची प्रक्रिया सुरु झाली असून चेअरमन ज्ञानदेव वाफारे यांच्या नावावर माळीवाडा येथे असलेला प्लॉट आणि त्याची पत्नी सुजाता वाफारे हिच्या नावावर असलेली नेप्ती (ता.नगर) येथील मालमत्ता लिलावाद्वारे विक्री करण्यात आली आहे. अन्य दोन संचालकांच्या नालेगाव येथील मालमत्तांचा लिलाव ८ मे रोजी होणार आहे.
संपदा पतसंस्थेत शेकडो ठेवीदारांच्या ठेवी अडकून पडलेल्या आहेत. या ठेवी व्याजासह परत मिळाव्यात, या मागणीसाठी काही ठेवीदारांनी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचाकडे दाद मागितली होती. यावर सुनावणी होऊन न्यायमंचाने संपदा पतसंस्थेचा तत्कालीन चेअरमन ज्ञानदेव सबाजी वाफारे याच्यासह सर्व संचालकांना दोषी धरून व्याजासह ठेवी परत करण्याचे आदेश दिले होते. या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत नगर तालुका तहसीलदार यांच्याकडे वसुलीसाठी (संपत्ती लिलाव) प्रकरण पाठविण्यात आले होते. या आदेशानुसार तहसीलदार यांनी संपदा नागरी सहकारी पतसंस्थेचे तत्कालीन संचालकांच्या नगर शहर व तालुक्यातील मालमत्ता जप्त करून विक्री करण्याचा निर्णय घेतला होता. लिलाव प्रक्रियाही सुरू करण्यात आली होती. या विरोधात संपदा पतसंस्थेचा तत्कालीन चेअरमन वाफारे व इतर संचालकांनी औरंगाबाद खंडपिठात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने ही याचिका फेटाळली होती.
त्यामुळे तहसीलदार संजय शिंदे यांनी जप्त मालमत्तांच्या लिलावाद्वारे विक्रीची प्रक्रिया सुरु केली आहे. १५ एप्रिल रोजी माळीवाडा येथे ज्ञानदेव वाफारे याच्या नावे असलेल्या १८६ चौ.मी. प्लॉटची लिलाव प्रक्रिया अप्पर तहसीलदार स्वप्निल ढवळे यांनी राबविली. मालमत्तेची अपसेट प्राइज ९ लाख ८२ हजार ८० रुपये होती. सदर मालमत्ता २३ लाख ५० हजारांना विकली गेली आहे. तर नेप्ती येथील सुजाता वाफारे हिच्या नावावर असलेल्या २६५.२५ चौ.मी. प्लॉटची लिलाव प्रक्रिया तहसीलदार संजय शिंदे यांनी राबविली. या मालमत्तेची अपसेट प्राइज ३ लाख ३६ हजार ८६८ रुपये होती. सदर मालमत्ता ५ लाख ५० हजारांना विकली गेली आहे.
संचालक भाऊसाहेब कुशाबा झावरे (मयत) आणि सुधाकर परशुराम थोरात यांच्या नावावर असलेल्या नालेगाव येथील २ मालमत्तांची लिलाव प्रक्रिया ८ मे रोजी होणार आहे.

Post a Comment