अहिल्यानगर
: नगर तालुक्यातील इमामपूर शिवारात
झेंडूच्या पिकात लपवून गांजाची बेकायदेशीर लागवड केल्याचा प्रकार स्थानिक गुन्हे
शाखा आणि एमआयडीसी पोलिसांनी उघडकीस आणला आहे. संयुक्तपणे केलेल्या या धडक कारवाईत
पोलिसांनी तब्बल २२ लाख २० हजार ७५० रुपये किमतीचे ४४ किलोहून अधिक वजनाचे गांजाचे
झाडे जप्त केली असून, याप्रकरणी
एकाला अटक केली आहे.
अहिल्यानगर
जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर व अंमली पदार्थ तस्करीवर कठोर कारवाई करण्याचे आदेश
पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी दिलेले आहेत. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे
शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी पोलीस उपनिरीक्षक संदीप दरवडे आणि
पोलीस अंमलदार विष्णू भागवत, दीपक
घाटकर, विकास साळवे, भीमराज खर्से,
रोहित येमुल, वंदना मोढवे यांचे एक पथक तयार
करून अवैध व्यावसायिकांची माहिती काढून कारवाई करण्याच्या सूचना देऊन रवाना केले
होते.
सदर
तपास पथक एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत गस्त घाजत असताना, इमामपूर (ता. नगर) येथील देविदास टिमकरे
याने त्याच्या शेतातील झेंडूच्या पिकांमध्ये गांज्याच्या झाडांची लागवड केल्याची
गोपनीय माहिती पथकाला मिळाली. मिळालेल्या माहितीची खात्री करून पथकाने एमआयडीसी
पोलीस ठाण्याचे स.पो.नि. हेमंत थोरात यांना लेखी अहवालाद्वारे माहिती कळवली.
त्यानंतर नगर ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षक शिरीष वमने यांच्या आदेशानुसार स.पो.नि. थोरात,
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक, श्रेणी पोलीस
उपनिरीक्षक जरे आणि एमआयडीसी पोलीस ठाण्याचे अंमलदार राजु सुद्रीक, गोरक्षनाथ केदार, ज्ञानेश्वर तांदळे, प्रल्हाद पालवे, सुरज देशमुख, राजेश
राठोड तसेच पंच व आवश्यक साहित्यासह इमामपूर शिवारातील संबंधित शेतात पोहोचले.
पंचासमक्ष
व आरोपी देविदास टिमकरे याच्या उपस्थितीत शेताची पाहणी केली असता, झेंडूच्या पिकाच्या आडोशाला गांजाची
लहान-मोठी झाडे जोमाने वाढलेली आढळून आली. पोलिसांनी याप्रकरणी मुख्य आरोपी देविदास
रंगनाथ टिमकरे (वय ६४, रा. इमामपूर, ता.
नगर) यास ताब्यात घेतले. त्याच्या शेतातून २२ लाख २० हजार ७५० रुपये किमतीची
४४.४१५ किलोग्राम वजनाची गांजाची लहान-मोठी झाडे जप्त करण्यात आली.
याप्रकरणी
आरोपीविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुंगीकारक औषधीद्रव्ये आणि मनोव्यापारावर
परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ चे कलम ८(ब)(क), २०(अ)(ब), २०(१)(२)(क) सह २२(क) प्रमाणे गुन्हा दाखल
करण्यात आला आहे. पुढील तपास एमआयडीसी पोलीस करत आहेत.

Post a Comment