नगर तालुका (प्रतिनिधी) - नगर दौंड रोडवर खंडाळा (ता.नगर) गावच्या शिवारात भरधाव वेगातील महिंद्रा बोलेरो गाडीने दुचाकीला समोरून जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. ३१ डिसेंबर रोजी रात्री ९ च्या सुमारास हा अपघात झाला. साहेबराव जगन्नाथ काळे (वय ४२, रा.सारोळा कासार, ता. नगर, हल्ली रा.केडगाव) असे मयताचे नाव आहे.
मयत साहेबराव हा त्याच्या टीव्हीएसस्टार मोटारसायकल वर नगरहून खडकीच्या दिशेने जात होता. खंडाळा गावच्या शिवारात दौंड कडून नगर कडे भरधाव वेगात येणाऱ्या महिंद्रा बोलेरो गाडीने त्याच्या मोटारसायकलला समोरून जोराची धडक दिली. यात तो गंभीर जखमी झाला. यावेळी तेथे जवळच असलेले माजी जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले तसेच नागरिकांनी अपघातस्थळी धाव घेत जखमी साहेबराव यास तातडीने उपचारासाठी नगरला रुग्णालयात पाठविले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच अरणगाव बायपास चौकात नाकाबंदी साठी थांबलेले नगर तालुका पोलिस ठाण्याचे स.पो.नि. प्रल्हाद गिते, पोलिस अंमलदार नितीन गांगुर्डे, विठ्ठल गोरे व पथकाने घटनास्थळी धाव घेत नागरिकांच्या मदतीने अपघातग्रस्त वाहने रस्त्यातून बाजूला करत वाहतूक सुरळीत केली.
या प्रकरणी नगर तालुका पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून मयताच्या नातेवाईकांच्या फिर्यादी नंतर बोलेरो चालकावर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Post a Comment