नगरच्या अरणगाव जवळ घडले भयंकर, बेदम मारहाणीत एकाचा मृत्यू


अहिल्यानगर - हॉटेलमधील काचेचे फर्निचर फोडल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून अरणगाव (ता.नगर)येथील एका व्यावसायिकाला पाच जणांनी मिळून बेदम मारहाण केली. या गंभीर मारहाणीत जखमी झालेल्या मिठु कार्तिक दत्त (वय ४२, रा. अरणगाव, ता.नगर) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सुपा पोलिस ठाण्याच्या पो.नि. ज्योती गडकरी यांनी फिर्याद दिली आहे. मिळालेली माहिती अशी की, कोमल फरसान मार्ट आणि हॉटेलचे मालक भाऊसाहेब विश्वनाथ नांगरे व जावेद छोटू आतार (दोघे रा. वाळकी, ता. नगर) यांच्याशी मयत मिठु दत्त यांचा फर्निचरच्या नुकसानीवरून वाद झाला होता. याच वादाचा राग मनात धरून आरोपी भाऊसाहेब नांगरे, जावेद आतार आणि त्यांच्या हॉटेलमधील तीन कामगारांनी मिळून ६ मार्च २०२५ रोजी अरणगाव च्या शिवारातील व्हीआरडीई जवळ असलेल्या  'अजय फॅब्रिकेशन' दुकानात घुसून दत्त यांना लाथाबुक्क्यांनी व शस्त्राने गंभीर मारहाण केली.

या हल्ल्यानंतर जखमी दत्त यांना तातडीने उपचारासाठी पुणे येथील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, १७ दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर २३ मार्च रोजी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याबाबत नगर तालुका पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांनी केला असून, तपासात मिठू दत्त याचा खुन झाल्याचे निष्पन्न झाले, त्यामुळे त्यांच्या फिर्यादीवरून पाचही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०३(), १८९ (), १९०, १९१ () () प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास नगर ग्रामीणचे उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने करत आहेत.

0/Post a Comment/Comments