रुईछत्तीशीत हॉटेल कामगारावर जीवघेणा हल्ला; लोखंडी वस्तूने डोके फोडले


नगर तालुका (प्रतिनिधी) - नगर तालुक्यातील रुईछत्तीशी परिसरात एका हॉटेल कामगारावर जुन्या वादातून लोखंडी वस्तूने आणि लाकडी दांडक्याने जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे. हॉटेल जय मल्हार समोर झालेल्या या हल्ल्यात संबंधित कामगार गंभीर जखमी झाला असून, याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत गंगा अर्जुन सुनार (मूळ रा.नेपाळ, हल्ली रा.रुईछत्तीशी, ता.नगर) यांनी नगर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांचे पती येथील एका हॉटेलमध्ये कामाला आहेत. महिनाभरापूर्वी आरोपींनी 'आमच्या हॉटेलवर कामाला आला नाही तर तुला उचलून नेऊ', अशी धमकी दिली होती. ६ फेब्रुवारी रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास फिर्यादीचे पती हॉटेलकडे जात असताना, आरोपी संजय दत्तात्रय नाईक (रा. वाळकी, ता.नगर) आणि त्याच्यासोबत असलेल्या दोन अनोळखी इसमांनी त्यांना अडवले.

काही समजण्यापूर्वीच आरोपी संजय नाईक याने लोखंडी वस्तूने त्यांच्या डोक्यात प्रहार केला. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. त्याचवेळी त्याच्या इतर दोन साथीदारांनी लाकडी दांडक्याने पाठीवर मारहाण करत शिवीगाळ केली. तसेच पुन्हा दिसल्यास जिवे मारण्याची धमकी देऊन आरोपी पसार झाले.

याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध गंभीर दुखापत केल्या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. .पो.नि. प्रल्हाद गिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पुढील तपास करत आहेत.

हे ही वाचा ...

अभिनेत्री म्हणाली...मी बॉयफ्रेंड बनवणारी पोरगी नाही.. डायरेक्ट नवरा पाहिजे आपल्याला...'

अखेर भारत- पाकिस्तान सामना होणार, टी 20 वर्ल्ड कपमध्ये आमने सामने येणार 

0/Post a Comment/Comments