अखेर भारत- पाकिस्तान सामना होणार, टी 20 वर्ल्ड कपमध्ये आमने सामने येणार



आयसीसी टी 20 वर्ल्ड कपला सुरुवात झाली आहे. क्रिकेट चाहत्यांना दिलासा देणारी अपडेट समोर आली आहे. 15 फेब्रुवारी रोजी श्रीलंकेतील कोलंबोतील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना होणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामना झाला नसता तर प्रायोजक, प्रक्षेपक यांचं मोठं नुकसान झालं असतं. आयसीसी सोबतच्या बैठकीत पीसीबीची काय चर्चा झाली हे अद्याप समोर आलेलं नाही मात्र, हा सामना होणार असल्याची माहिती समोर आली आहे.   

पाकिस्तान टी 20 वर्ल्ड कपमध्ये भारताविरोधात खेलण्यास तयार झाला आहे. वेळापत्रकाप्रमाणे हा सामना 15 फेब्रुवारीला कोलंबोत होईल. लाहोरमध्ये पाकिस्तान आणि  आयसीसीमध्ये झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत पाकिस्तान आणि बांगलादेशनं आयसीसीसमोर काही मागण्या ठेवल्या होत्या, त्यापैकी काही मागण्या स्वीकारल्या गेल्याची माहिती आहे.

बांगलादेशला टी 20 वर्ल्ड कपमधून बाहेर काढलं गेलं होतं. लाहोरच्या बैठकीत बांगलादेशला भरपाई दिली जावी, अशी मागणी करण्यात आली होती. आयसीसीनं याला सहमती दर्शवली. अंडर -19 वर्ल्ड कप आणि महिला क्रिकेट वर्ल्ड कपच्या आयोजनाची जबाबदारी बांगलादेशला दिली जाऊ शकते.  

पाकिस्ताननं आयसीसीकडून मिळणाऱ्या उत्पन्नात वाढ करण्याची मागणी केली होती. आयसीसीकडून पाकिस्तानला 5.75 टक्के रक्कम दिली जाते. जी 34-35 दशलक्ष अमेरिकन डॉलर आहे. आयसीसीनं यावर विचार करु असं सांगितलं आहे.  

भारत पाकिस्तान मालिकेची मागणी फेटाळली

भारत आणि पाकिस्तान यांच्यात 2012 नंतर द्वीपक्षीय मालिका झालेली नाही. पाकिस्ताननं द्वीपक्षीय मालिका सुरु करण्याची मागणी केली होती. आयसीसीनं ही मागणी फेटाळली आहे. यावरील निर्णय त्यांच्या कार्यकक्षेत नसल्याचं म्हटलं.

टी 20 वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना त्रयस्थ ठिकाणी म्हणजेच श्रीलंकेच्या कोलंबोत होणार आहे. दोन्ही देशांच्या क्रिकेट बोर्डांमध्ये हायब्रीड मॉडेलवर सहमती झाली होती. 


 

0/Post a Comment/Comments