नंदुरबार - नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यात कार्यरत असलेल्या एका प्राथमिक शिक्षकाने पत्नी आणि दोन लहान मुलांची हत्या करून स्वतः आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील हत्तीद या मूळ गावी ही दुर्दैवी घटना घडली असून संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
कुटुंबीयांचा मृत्यू झाल्यानंतर शिक्षकानेही घेतला गळफास
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित शिक्षक तळोदा तालुक्यात मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते. शाळांना सुट्टी असल्याने ते पत्नी आणि दोन मुलांसह आपल्या मूळ गावी आले होते. याच दरम्यान त्यांनी कुटुंबातील सदस्यांना आईस्क्रीममधून विष दिल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यानंतर पत्नी आणि दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाला. कुटुंबीयांचा मृत्यू झाल्यानंतर शिक्षकानेही गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.
शेअर मार्केटमधील कोट्यवधींच्या तोट्याने संसार उद्ध्वस्त
प्राथमिक तपासात संबंधित शिक्षकाला शेअर मार्केटमध्ये एक कोटी रुपयांहून अधिक आर्थिक फटका बसल्याची माहिती समोर येत आहे. आर्थिक संकट आणि मानसिक तणावातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत.
या घटनेमुळे दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावात शोककळा पसरली आहे. नेमके कारण काय होते, विषप्रयोग कसा करण्यात आला आणि आर्थिक नुकसानीचा या घटनेशी किती संबंध आहे, याचा सखोल तपास पोलीस करत आहेत. प्राथमिक माहितीनुसार ही घटना आर्थिक तणावातून घडल्याची शक्यता वर्तवली जात असली तरी अधिकृत तपास अहवालानंतरच संपूर्ण सत्य समोर येणार आहे.

Post a Comment