नगरमध्ये पहाटे बसमधून उतरलेल्या प्रवाशाला चौघांनी उचलून नेलं, नंतर पुढे भयानक घडलं...


अहिल्यानगर - हैदराबाद येथून कंपनीचे काम उरकून पहाटेच्या सुमारास नगरमध्ये परतलेल्या एका तरुणाला चार अनोळखी इसमांनी गाठून बेदम मारहाण केली. "आमच्या दुचाकीचे नुकसान झाले आहे," असा बहाणा करून या टोळीने फिर्यादीला धमकावत चक्क एटीएममधून १० हजार रुपये काढायला लावून ते लुटले. ही खळबळजनक घटना स्टेशन रोडवर कोठी परिसरात १३ मे रोजी पहाटेच्या सुमारास घडली.

याबाबत राहुल चंद्रभान दारकुंडे (वय ३०, रा. घुटेवाडी, श्रीगोंदा) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे सुपा एमआयडीसीतील एका कंपनीत फिटर म्हणून काम करतात. ते कंपनीच्या कामानिमित्त हैदराबाद येथे गेले होते. १३ मे रोजी पहाटे राहुल आणि त्यांचा सहकारी हैदराबादहून बसने अहिल्यानगरमधील चांदणी चौकात उतरले. तिथून ते माळीवाडा बसस्थानकाकडे पायी जात असताना पाटील हॉस्पिटल जवळ मागून आलेल्या एका दुचाकीचा त्यांना धक्का लागला. त्यामुळे राहुल आणि तो दुचाकीस्वार हे दोघेही रस्त्यावर खाली पडले. यावरून दुचाकीस्वाराने राहुल यांना शिवीगाळ करत मारहाण सुरू केली. त्याच वेळी दुसऱ्या दुचाकीवरून आणखी तीन तरुण तिथे आले.

या चौघांनी राहुल यांना ओढत नेऊन क्लेराब्रुस मैदानात नेले. तिथे काठीने आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करत ५ हजार रुपयांची मागणी केली. पैसे नसल्याचे सांगितल्यावर आरोपींनी त्यांना जबरदस्तीने दुचाकीवर बसवून माळीवाडा येथील बँकेच्या एटीएमवर नेले. तिथे राहुल यांना १० हजार रुपये काढायला लावून ते हिसकावून घेतले. त्यानंतर आरोपींनी त्यांना स्वस्तिक बसस्थानकासमोरील एका निर्जन ठिकाणी नेऊन पुन्हा मारहाण केली.  

राहुल यांचे मेव्हणे अविनाश गव्हाणे यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनाही आरोपींनी मारहाण केली. आरडाओरडा झाल्याने आरोपी दुचाकीवरून पसार झाले. सध्या राहुल यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, कोतवाली पोलिसांनी त्यांच्या जबाबावरून अनोळखी चौघांवर गुन्हा दाखल केला आहे


 

0/Post a Comment/Comments