नगर तालुका (प्रतिनिधी) - नगर तालुक्यातील देऊळगाव सिद्धी येथे जुन्या वादावरून आणि मेडिकलच्या उधारीच्या कारणावरून दोन कुटुंबांमध्ये लोखंडी रॉड, लाकडी काठ्या आणि गजाने तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. या हाणामारीत दोन्ही बाजूंचे महिलांसह अनेक जण जखमी झाले असून, दोन्ही गटांनी दिलेल्या परस्परविरोधी फिर्यादीवरून नगर तालुका पोलिस ठाण्यात १४ ते १५ जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पहिल्या घटनेत, मुक्ताबाई मच्छिंद्र चितळकर (वय ३२, रा. देऊळगाव सिद्धी, ता.नगर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, १२ जुलै रोजी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास त्या त्यांच्या घरासमोर उभ्या असताना आरोपी शिवाजी लक्ष्मण इंगळे, किरण शिवाजी इंगळे, अक्षय दिलीप इंगळे, दिलीप लक्ष्मण इंगळे, मंदा शिवाजी इंगळे, मनिषा दिलीप इंगळे, जया किरण इंगळे व इतर दोघांनी त्यांना घेरले. आरोपींनी "तू आमच्यावर मागचे वर्षी केस केली आहे, ती मागे घे नाहीतर जिवंत सोडणार नाही" असे म्हणत शिवीगाळ सुरू केली.
फिर्यादीने केस मागे घेण्यास नकार दिल्याने आरोपींनी त्यांना कानाखाली मारली. मुक्ताबाईंचा ओरडण्याचा आवाज ऐकून त्यांचे पती, चुलत सासरे आणि दीर सचिन हे सोडवा-सोडव करण्यासाठी आले असता, आरोपींनी त्यांच्यावर चाकू, लोखंडी रॉड आणि लाकडी काठीने हल्ला केला. यात फिर्यादीचे पती व सासरे गंभीर जखमी झाले असून, हाणामारीत पतीच्या गळ्यातील सोन्याची चेन तुटून गहाळ झाली आहे. आरोपींनी "केस मागे घ्या, नाहीतर गोळ्या घालून मारून टाकू" अशी धमकी दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
तर दुसऱ्या बाजूने, शिवाजी लक्ष्मण इंगळे (वय ५५, रा. देऊळगाव सिद्धी, ता. नगर) यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार, फिर्यादी यांच्या मुलाने आरोपी मुक्ताबाई चितळकर यांच्या मेडिकलमधून ६०० रुपयांचे साहित्य उधारीवर आणले होते. याच उधारीच्या कारणावरून वाद होऊन आरोपी सचिन लक्ष्मण चितळकर, मच्छिंद्रनाथ लक्ष्मण चितळकर, भाऊसाहेब नारायण चितळकर, मुक्ताबाई मच्छिंद्र चितळकर, सुवर्णा सचिन चितळकर, सारीका गोरक्ष चितळकर आणि गोरक्ष मंजाबापु चितळकर यांनी बेकायदेशीर मंडळी जमवून फिर्यादी यांच्या कुटुंबावर हल्ला केला.
आरोपी सचिनने लाकडी काठीने फिर्यादीच्या पाठीवर व खांद्यावर मारहाण केली, तर मच्छिंद्रनाथने लोखंडी गजाने फिर्यादीच्या कपाळावर मारून गंभीर जखमी केले. यावेळी सोडवण्यासाठी आलेल्या फिर्यादीचा मुलगा किरण आणि पत्नी मंदाकिनी यांनाही आरोपींनी लाकडी काठीने व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करत "आमच्या नादी लागले तर जिवंत सोडणार नाही" अशी धमकी दिली.या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
या दोन्ही गुन्ह्यांचा तपास स.पो.नि. गणेश वारुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ. शिवाजी माने व पो.हे.कॉ. खेडकर हे करत आहेत.

Post a Comment