नगर तालुका (प्रतिनिधी) - नगर तालुक्यातील गुंडेगाव येथील बळीराम देविदास शिंदे (वय २८) या तरुणाच्या खुनाच्या गुन्ह्यातील वर्षभरापासून फरार असलेल्या मुख्य आरोपीला नगर तालुका पोलिसांच्या पथकाने अखेर अटक केली आहे. ओंकार उर्फ गोट्या हरकुस बोठे (रा. देऊळगाव सिद्धी, ता. जि. अहिल्यानगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून या गुन्ह्यातील आणखी एक आरोपी अद्याप फरार आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, २२ जून २०२५ रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास गुंडेगाव ते देऊळगाव सिद्धी रस्त्यावरील उतारवाट परिसरात जुन्या वादाच्या कारणावरून बळीराम शिंदे याचा कट रचून निर्घृण खून करण्यात आला होता. याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात आरोपी डॅनियल येशुदास जावळे, नवनाथ उर्फ राहुल दिलीप राऊत, सोन्या उर्फ अमोल चंद्रकांत भुजबळ, आनंद बाळासाहेब वरकड आणि ओंकार उर्फ गोट्या हरकुस बोठे यांच्याविरुद्ध बी.एन.एस. कलम १०३(१), ६१(२), ३२४(४), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिसांनी यापूर्वीच गुन्ह्यातील आरोपी डॅनियल येशुदास जावळे (वय २६), नवनाथ उर्फ राहुल दिलीप राऊत (वय २६) आणि सोन्या उर्फ अमोल चंद्रकांत भुजबळ (वय २४) यांना अटक करून त्यांच्याविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र देखील दाखल केले आहे. मात्र, गुन्ह्यातील इतर दोन आरोपी आनंद बाळासाहेब वरकड आणि ओंकार उर्फ गोट्या हरकुस बोठे हे गुन्हा घडल्यापासून फरार होते.
त्यामुळे पोलीस त्यांचा कसून शोध घेत होते. दरम्यान, ८ जुलै रोजी नगर तालुका पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यांनी सापळा रचून १ वर्षापासून पोलिसांना गुंगारा देणारा आरोपी ओंकार उर्फ गोट्या बोठे याला बेड्या ठोकल्या. त्याला न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी सुनावली आहे.
सदरची कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वारुळे, सहाय्यक फौजदार दत्तात्रय हिंगडे, पो. हे.कॉ. सुभाष थोरात, मंगेश खरमाळे, नितीन शिंदे आणि पोलीस कॉन्स्टेबल विक्रांत भालसिंग यांच्या पथकाने केली आहे.

Post a Comment