केडगावात रात्रीच्या वेळी घर फोडून दागिने व रोकड चोरट्यांनी पळविली


अहिल्यानगर - केडगाव परिसरातील सचिन नगर येथे एका बंद घराचा कडीकोंडा तोडून अज्ञात चोरट्याने सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रकमेसह १ लाख ४१ हजार रुपयांचा ऐवज लांबवल्याची घटना ३१ जुलै रोजी सकाळी उघडकीस  आली आहे. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अभिजीत सुधाकर काजळे (वय ३७, रा. सचिन नगर, केडगाव) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे कुटुंबासह राहतात. त्यांच्या आईवर रुग्णालयात उपचार सुरू असल्याने कुटुंबातील सर्व सदस्य रात्री जेवण करून वरच्या मजल्यावर झोपण्यासाठी गेले होते. त्यापूर्वी त्यांनी खालच्या खोलीला आणि मुख्य गेटला कुलूप लावले होते.

सकाळी आठ वाजेच्या सुमारास अभिजीत काजळे हे खाली आले असता, दरवाजाची कडी तुटलेली आणि कुलूप गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी आत जाऊन पाहिले असता घरातील कपाटातील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले दिसले. तपास केला असता कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने, चांदीच्या वस्तू आणि रोख रक्कम चोरीला गेल्याचे स्पष्ट झाले. चोरीस गेलेल्या मालात १० ग्रॅमचा सोन्याचा नेकलेस, सोन्याच्या अंगठ्या, सोन्याचे डोरले, कर्णफुले असे २६ ग्रॅम सोन्याचे तर ३०० ग्रॅम चांदीचे दागिने आणि ७ हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण १ लाख ४१ हजार रुपयांचा मुद्देमाल आहे.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. अभिजीत काजळे यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास स.पो.नि. कुणाल सपकाळे हे करत आहेत.

0/Post a Comment/Comments