अहिल्यानगरमध्ये पुन्हा ५.८३ लाखांचे 'एमडी' ड्रग्ज जप्त; चक्क बिश्नोई कनेक्शन आले समोर


अहिल्यानगर - तोफखाना पोलिसांनी सावेडी उपनगरात एम डी ड्रग्ज पकडल्याची घटना ताजी असतानाच एमआयडीसी पोलिसांनीही निंबळक बायपास भागात मोठी कारवाई करत सुमारे ५ लाख ८३ हजार २०० रुपये किमतीचे २९.१६ ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) हे अंमली पदार्थ जप्त केले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी राजस्थान येथील एका तरूणाला अटक केली आहे. आरोपीकडून गाडी आणि मोबाईलसह एकूण ११ लाख ४३ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे, तर त्याचे दोन साथीदार घटनास्थळावरून पसार झाले आहेत.

गस्तीवर असताना पोलिसांना निंबळक बायपास येथील लामखेडे पेट्रोल पंपाजवळ दोन गाड्या संशयास्पद उभ्या असल्याचे दिसले. पोलीस चौकशीसाठी पुढे गेले असता, एका गाडीतील दोघे जण पळून गेले. मात्र, पोलिसांनी दुसऱ्या विनानंबर स्विफ्ट कारजवळ उभ्या असलेल्या तरूणाला पकडले. चौकशीत त्याने आपले नाव रविप्रकाश भेराराम बिश्नोई (वय २९, मूळ रा. राजस्थान, सध्या रा. करमाळा, जि. सोलापूर) असे सांगितले.

संशय आल्याने पोलिसांनी पंचांसमक्ष गाडीची झडती घेतली. तेव्हा स्विफ्ट कारच्या मागील सीटवर प्लास्टिकच्या पिशवीत आणि तीन पुड्यांमध्ये एकूण २९.१६ ग्रॅम मेफेड्रोन ड्रग्ज सापडले. आरोपीने हे ड्रग्ज विक्रीसाठी आणल्याचे मान्य केले आहे. पळून गेलेल्या दोन साथीदारांपैकी एकाचे नाव तांबे असल्याचे समोर आले असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

हा ड्रग्जचा साठा राजस्थानमधून सोलापूरमार्गे अहिल्यानगरमध्ये विक्रीसाठी आणला जात असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात, पोलीस उपनिरीक्षक मनोज मोंढे, अंमलदार संदीप पवार, उमेश शेरकर, सचिन हरदास, सूरज देशमुख व अक्षय रोहोकले यांच्या पथकाने ही कारवाई केली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


 

0/Post a Comment/Comments