रानडुकराच्या हल्ल्यात शेतात काम करणाऱ्या ६६ वर्षीय वृद्ध महिलेचा दुर्दैवी मृत्यू


नगर तालुका (प्रतिनिधी) - नगर तालुक्यातील देऊळगाव सिद्धी येथील वृद्ध महिलेचा रानडुकराने चावा घेतल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. कांताबाई जगन्नाथ कदम (वय ६६, रा. देऊळगाव सिद्धी, ता. नगर) असे या मृत महिलेचे नाव आहे. ३० जून रोजी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास गुंडेगाव रोड येथील बेंदाडवस्ती परिसरात हा प्रकार घडला.

मयत कांताबाई व त्यांचा नातू हे दुपारी बेंदाडवस्ती परिसरात आपल्या शेतात काम करत होते. तेव्हड्यात त्या ठिकाणी एक रानडुक्कर पळत आले. त्याने अगोदर रस्त्याने सायकलवर चाललेल्या एका व्यक्तीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, मात्र तो थोडक्यात बचावला. त्यानंतर त्या रान डुकराने कांताबाई शेतात काम करणाऱ्या कांताबाई यांच्या नातवावर हल्ल्याचा प्रयत्न केला. मात्र त्याच्या हातात खोरे होते. त्याने त्या खोऱ्याच्या सहाय्याने त्याला हुसकावले.  

त्यानंतर झाडांच्या आळ्यातील गवत काढत असलेल्या कांताबाई यांना रानडुकराने धडक देत खाली पाडले.त्यानंतर त्यांच्यावर हल्ला चढवला आणि चावा घेत त्यांच्या पायाचे व इतर शरीराचे लचके तोडले. त्यामुळे त्या गंभीररीत्या जखमी झाल्या. त्यांना त्यांचा मुलगा बापू जगन्नाथ कदम यांनी त्यांना तातडीने उपचारासाठी नगर येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच वाटेतच त्यांचा मृत्यू झाला होता. तेथील मेडिकल ऑफिसर डॉ. काळे यांनी तपासून त्यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केले.

या संदर्भातील अहवालावरून नगर तालुका पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.या घटनेची माहिती मिळताच वन विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. हल्ला करणारे हे रानडुक्कर पिसाळलेले असावे असा अंदाज व्यक्त केला जात आहे.  या घटनेमुळे देऊळगाव सिद्धी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मयत कांताबाई यांच्यावर रात्री देऊळगाव सिद्धी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती, १ मुलगा, २ मुली, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे


 

0/Post a Comment/Comments