पारनेर - पतीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पत्नीसह प्रियकरावर गुन्हा दाखल; धक्कादायक कारण आले समोर


पारनेर - पारनेर तालुक्यातील ढोकी येथे एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला असून, पत्नी आणि तिच्या प्रियकराच्या छळाला कंटाळून एका ३५ वर्षीय तरुणाने विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पारनेर पोलीस ठाण्यात दोघांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संतोष विठ्ठल नऱ्हे (वय ३५, रा. ढोकी, ता. पारनेर ) असे आत्महत्या केलेल्या मयताचे नाव आहे. मयताची पत्नी आशाबाई आणि सुरेश नऱ्हे या दोघांमध्ये प्रेम संबंध होते. या प्रेम संबंधातून ते दोघे मयत संतोष यास वेळोवेळी मानसिक व शारीरिक त्रास देत असत.

"तू मरून जा, त्यानंतर आम्हाला लग्न करता येईल व जमीन आमच्या नावावर करता येईल, मला सोडचिठ्ठी देऊन टाक" असे म्हणून ते संतोषला वारंवार त्रास देत होते. या सततच्या छळाला कंटाळून संतोषने २० जून रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घरात विषारी औषध पिऊन आपली जीवनयात्रा संपवली.

मयत संतोष यांच्या आई पारूबाई विठ्ठल नऱ्हे (वय ५२, रा. ढोकी, ता. पारनेर) यांनी २५ जून रोजी याबाबत फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी मयत संतोषची पत्नी आशाबाई आणि तिचा प्रियकर सुरेश आप्पा नऱ्हे (दोन्ही रा. ढोकी, ता. पारनेर) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०८, ११५(२), ३५२, ३५१(२), ३(५) प्रमाणे आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. पारनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन खंडागळे पुढील तपास करत आहेत.


 

0/Post a Comment/Comments