बापरे... मुरुम चोरांचा पाठलाग करणाऱ्या दोघांच्या अंगावर घातला जेसीबी; १ ठार तर १ जखमी


अहिल्यानगर - नगर तालुक्यातील धनगरवाडी परिसरातून बेकायदेशीरपणे मुरुम चोरी करून पळून जाणाऱ्या चोरांचा पाठलाग करणाऱ्या दोन तरुणांच्या दुचाकीला जेसीबी चालकाने जाणीवपूर्वक जोराची धडक दिली. या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला असून एक जण जखमी झाला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात जेसीबी चालकासह दोघांच्या विरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत विजय दत्तु कजबे (वय ३८, रा. तपोवनरोड, अहिल्यानगर) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी जखमी झालेले असून प्रदीप चिंचने या तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. २८ मे रोजी मध्यरात्री धनगरवाडी गावच्या शिवारातील हनुमान मंदिराजवळील एका प्लॉटमधून काही लोक जेसीबीच्या सहाय्याने मुरुम चोरी करत असल्याची माहिती फिर्यादी विजय कजबे यांना मिळाली होती. त्यानुसार ते घटनास्थळी गेले असता, आरोपी राम म्हस्के आणि त्याचा जेसीबी चालक तेथून वाहनांसह जेऊर गावाच्या दिशेने पळून जात होते. विजय कजबे आणि त्यांचा मित्र प्रदीप चिंचने यांनी आपल्या मोटार सायकलवरून (क्र. एम.एच. १६ बी.जे. २१२६) या चोरांचा पाठलाग केला. अहिल्यानगर ते छत्रपती संभाजीनगर जाणाऱ्या रस्त्यावरील जरे वस्तीजवळ त्यांनी जेसीबीला अडवण्याचा प्रयत्न केला.

यावेळी जेसीबी चालकाने पळून जाण्याच्या उद्देशाने आपले वाहन भरधाव वेगात चालवले. आपल्या या कृतीमुळे कोणाचा जीव जाऊ शकतो याची पूर्ण जाणीव असतानाही, त्याने कजबे यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली व त्यांना काही अंतरापर्यंत फरपटत नेले. या अपघातात प्रदीप चिंचने यांचा मृत्यू झाला, तर विजय कजबे हे जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात आरोपी राम म्हस्के व जेसीबी चालक या दोघांच्या विरुद्ध २९ मे रोजी रात्री सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मनोज मोंढे पुढील तपास करत आहेत.


 

0/Post a Comment/Comments