नगर तालुका (प्रतिनिधी) - मित्राच्या पत्नीला सोशल मीडियावर मेसेज पाठवल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या तरुणाला जमावाने बेदम मारहाण केल्याची खळबळजनक घटना अरणगाव शिवारात घडली आहे. या प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात वसीम शेख याच्यासह ३० ते ४० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी किरण रामदास काळे हे पुण्यातील रहिवासी असून त्यांचे मूळ गाव घोसपुरी आहे. किरण यांच्या मित्राच्या पत्नीला आरोपी वसीम शेख याने इंस्टाग्रामवर मेसेज पाठवले होते. या प्रकरणाचा जाब विचारण्यासाठी किरण हे आरोपीच्या गॅरेजवर गेले होते. यावेळी संतापलेल्या वसीम शेख याने बेकायदेशीर जमाव जमवून किरण यांच्यावर हल्ला चढवला.
या हल्ल्यात आरोपींनी केबल, लोखंडी रॉड आणि लाठ्याकाठ्यांचा वापर करून किरण यांना बेदम मारहाण केली. इतकेच नव्हे तर आरोपींनी त्यांना लाथाबुक्कीने मारहाण करत अत्यंत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. किरण यांनी तातडीने रुग्णालयात उपचार घेऊन पोलिसांत धाव घेतली.
नगर तालुका पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. पोलीस उपनिरीक्षक गांगुर्डे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. सपोनि प्रल्हाद गिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक आरोपींचा शोध घेत असून, लवकरच अटकेची कारवाई होण्याची शक्यता आहे.

Post a Comment