नगर तालुका (प्रतिनिधी) - मोबाईल जेसीबी खाली सापडून फुटल्याने दोन कामगारांमध्ये वाद झाले. त्यातील एकाने घरी जावून त्याच्या १० साथीदारांना घेवून येत परप्रांतीय कामगाराला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करत दगडांनी ठेचून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना केडगाव - सोनेवाडी रोडवर असलेल्या निशा इन्फ्रास्ट्रक्चरच्या आरएमसी प्लँटमध्ये घडली. या हल्ल्यात शाबीर अन्सारी (मूळ रा. झारखंड, हल्ली रा. सोनेवाडी, ता. नगर) हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
याबाबत त्याचा सहकारी जहागीर हलीम अन्सारी (मूळ रा. झारखंड, हल्ली रा. सोनेवाडी, ता. नगर) याने ५ मार्च रोजी नगर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी व जखमी हे निशा इन्फ्रास्ट्रक्चरच्या आरएमसी प्लँटमध्ये कामगार आहेत. त्याच ठिकाणी विशाल नावाचा तरुण हा जेसीबी चालक आहे. २ मार्च रोजी सकाळी जखमी शाबीर अन्सारी याने जेसीबीवर त्याचा मोबाईल ठेवला होता. विशाल याने जेसीबी अचानक चालू केल्याने तो मोबाईल जेसीबी खाली पडून फुटला. त्यामुळे दोघांमध्ये वाद झाले. ते काही वेळात मिटले होते. त्यानंतर दुपारी ४.४५ च्या सुमारास आरोपी विशाल आणि त्याच्या १० साथीदारांनी अचानक येऊन शाबीर अन्सारी याला गाठले.
त्यानंतर आरोपींनी त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करत दगडाने गंभीर जखमी केले. एवढ्यावरच न थांबता आरोपींनी पीडित तरुणाच्या डोक्यावर व छातीवर प्रहार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी फिर्यादीलाही आरोपींनी मारहाण केली. घटनेनंतर सर्व आरोपी तेथून पसार झाले. जखमीला इतर कामगारांनी उपचारासाठी नगरच्या खाजगी रुग्णालयात दाखल केले.
त्यानंतर जहागीर अन्सारी याने ५ मार्च रोजी नगर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून नगर तालुका पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स.पो.नि. गणेश वारुळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक जयेश गांगुर्डे पुढील तपास करत आहेत.
हे ही वाचा ...
अभिनेत्री वर्षा उसगावकर यांची लाखो रुपयांची फसवणूक
'धुरंधर-२' विषयी मोठी अपडेट, सरप्राईजसाठी तयार राहा

Post a Comment