मुंबई - महाराष्ट्र विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी भाजपच्या वाट्याला ज्या जागा आल्या आहेत, त्यासाठी उमेदवार निश्चित करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. यासाठी राज्यस्तरावरून ३० नावांची एक यादी दिल्लीत वरिष्ठांकडे पाठविण्यात आली आहे. त्यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील युवा नेते विवेक कोल्हे यांचेही नाव असल्याची माहिती मिळाली.
गेल्या विधानसभा निवडणुकीत कोल्हे यांना भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी शब्द दिला होता. महायुती अर्थात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आशुतोष काळे यांना विधानसभेत पाठविण्यासाठी कोल्हे यांनी थांबावे, त्या बदलत्यात त्यांना दुसरी संधी दिली जाईल, असा शब्द राज्यातील आणि थेट दिल्लीतील पक्षाच्या नेत्यांनी कोल्हे यांना दिला होता. दीर्घकाळच्या प्रतीक्षेनंतर आता ती संधी कोल्हे यांच्या दृष्टिपथात आली आहे. विधान परिषदेचे उमेदवार म्हणून कोल्हे यांचे नाव दिल्लीत पाठविण्यात आले आहे. अर्थात शब्द देण्यात दिल्लीतील वरिष्ठही होते, त्यामुळे विवेक कोल्हे यांचे नाव निश्चित होण्याची केवळ औपचारिकताच बाकी असल्याचे मानले जात आहे. तसेच पुढे ही निवडणूकही केवळ औपचारिताच आहे. त्यामुळे कोल्हे आमदार होणार आणि जिल्ह्यात आणखी एका आमदाराची भर पडणार हे आता जवळपास नक्की झाले असल्याचे मानले जाते. कारण भाजपला आता दिलेला शब्द पाळावा लागेल. अन्यथा त्याचा चुकीचा संदेश कार्यकर्त्यांमध्ये जाण्याची शक्यता असते.
अहि्ल्यानगर जिल्ह्यात विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे आणि आमदार सत्यिजित तांबे हे दोन सदस्य जिल्ह्यातील आहेत. त्यात कोल्हे यांची भर पडेल. लवकरच रिक्त असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूक होऊन विधान परिषदेचा आणखी एक आमदार वाढणार आहे. विधान सभेचे बारा आणि परिषदेचे चार असे १६ आमदार नगर जिल्ह्यातील होती. (विधान परिषदेवर २०२४ मध्ये निवडून गेलेले आमदार शिवाजीराव गर्जे हेही मूळचे नगर जिल्ह्यातील आहेत.)
भाजपच्या यादीत कोण कोण
महाराष्ट्र भाजपकडून दिल्लीला पाठवण्यात आलेल्या ३० नावांच्या यादीत विवेक कोल्हे यांच्यासह माधवी नाईक डॉ. उपेंद्र कोठेकर, मनोज कोटक, केशव उपाध्याय, रवी अनासपुरे, राजेश पांडे, दयाशंकर तिवारी, राम सातपुते, रणजीत सिंग निंबाळकर, संजय काका पाटील, जगदीश मुल्लिक, प्रमोद जठार, संजय केनेकर, अर्चना पाटील चाकुरकर, दादाराव केचे, संजय भेंडे या नेत्यांची नावे असल्याचे सांगण्यात येते. वाट्याला आलेल्या जागांच्या तुलनेत ही यादी मोठी असल्याने वरिष्ठ पातळीवरून काटेकोर छाणनी केली जाण्याची शक्यता आहे.

Post a Comment