अभिनेत्री वर्षा उसगावकर यांची लाखो रुपयांची फसवणूक


 
मुंबई -मराठी सिनेसृष्टी मधील सदाबहार अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्या बद्दल एक चिंताजनक माहिती समोर येत आहे. त्यांना भरघोस परताव्याचे आमिष दाखवून लाखो रुपयांचा चुना लावल्याची माहिती समोर आली आहे. मराठी सोबतच बॉलीवूड मध्ये आपल्या अभिनयाचे जादू दाखवणाऱ्या वर्षा उसगावकर या ९० च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री होत्या. अजूनही त्या वेगवेगळ्या मालिकांमध्ये सक्रिय दिसतात. बिग बॉस सारख्या शोमध्ये त्यांनी स्पर्धक म्हणून सहभाग घेतला होता. 

वर्षा उसगावकर आणि अभिनेत्री मृणालिनी जांभळे त्यांच्यासह अन्य काही लोकांची ४७ लाखांची फसवणूक झाली आहे. याप्रकरणी आता बिल्डर तसेच चित्रपट निर्माता अविनाश जाधव यांच्या विरोधात पोलीस तक्रार दाखल केली आहे. दादर येथील शिवाजी पार्क पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला गेला.

तक्रारदार मृणालिनी जांभळे यांची आरोपीशी व्यवसायिकरीत्या ओळख होती. अविनाश जाधव यांनी त्यांना आपण फिल्म प्रोड्यूसर आणि बिल्डर आहोत असे सांगितलेले. अविनाश जाधवने अभिनेत्रीला ऑफर दिली की डोंबिवलीतल्या एका बांधकाम प्रोजेक्टमध्ये जर त्यांनी पैसे गुंतवले तर वर्षभराच्या आत ते मोठ्या परताव्यासह मुद्दल परत देतील. अभिनेत्री या आमिषाला भुलली आणि त्यात पैसे गुंतवले. वर्षा उसगांवकर यांच्याबाबतीतही असेच झाले.

नोव्हेंबर २०१९ ते फेब्रुवारी २०२० दरम्यान अभिनेत्री वर्षा उसगावकर, मृणालिनी जांभळे आणि इतर तिघांनी मिळून चेक व ऑनलाइन ट्रांजॅक्शन मार्फत तब्बल ४७ लाख रुपयांची गुंतवणूक केली. सुरुवातीच्या काळात अविनाश यांनी त्यांना ४.५२ लाख रुपये परत दिलेले पण नंतर त्यांनी पैसे देणे थांबवले. जेव्हा पैसे परत मागण्यासाठी अभिनेत्री त्यांना फोन करत होती तेव्हा त्यांनी फोन उचलायला टाळाटाळ केली, आपला नंबर बदल आणि पत्ता सुद्धा बदलून तिथून पसार झाला. नंतर जेव्हा त्याला डोंबिवलीत गाठले तेव्हा मात्र त्याने पैसे देण्यास स्पष्ट नकार देऊन त्या उलट धमकी देण्यास सुरुवात केली. पोलिसांमध्ये नोंदवलेल्या तक्रारीत आरोपीने वर्षा उसगावकर व इतरांना मी पैसे देणार नाही तुम्हाला जे काय करायचे ते करा असं म्हणत धमकावल्याची नोंद आहे.


 

0/Post a Comment/Comments