अहिल्यानगर : अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड येथील कला केंद्रातल्या अंतर्गत वादातून एका गरोदर महिलेच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळून मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अपहरण करून अगोदर मारहाण करत बेशुद्ध अवस्थेत असलेल्या त्या महिलेला २७५ किलोमीटर लांब धुळ्यामध्ये निर्मनुष्य ठिकाणी पेट्रोल टाकून जाळल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणात सहा आरोपी निष्पन्न झाले आहेत, त्यातील चार आरोपी धाराशिवचे असून जामखेड येथील सप्तसूर कला केंद्रातून चौघांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर दोघेजण अजून फरार आहेत.
कला केंद्रातील अंतर्गत वादातून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती आहे. पिंकी हनुमंत काटकर असं मृत तरुणीचे नाव असून ती गर्भवती होती. आरोपींनी अगोदर तिचे अपहरण केले, तिला मांजरसुंबा (जि.बीड) येथील चौफुली इथे एका घरात मारहाण केली, यामध्ये ती बेशुद्ध झाली. ती मृत झाल्याचे समजून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने चार चाकी गाडी टाकून तिला राज्यस्थानकडे घेऊन जात होते. रस्त्यातच धुळे येथे निर्जन स्थळी तिला पेट्रोल टाकून जाळण्यात आले. संशयास्पद चार चाकीची महामार्गावरील सीसीटीव्ही फुटेजची धुळे पोलिसांनी ११ तास तपासणी केली. यातून या हत्येचा उलघडा झाला.
याप्रकरणी सरफराज उर्फ शफिक मोमीन (वय ३५,रा. कळंब, धाराशिव), आरिफ उर्फ खुज्या शेख (वय ३१, रा. कळंब धाराशिव), स्वाती उर्फ आरती कुऱ्हाडे (वय २८, सुप्तसूर सांस्कृतिक कला केंद्र जामखेड), लक्ष्मी पवार (वय ३०, रा. कळंब, धाराशिव) या आरोपींना ताब्यात घेण्यात आलं आहे. तर फारुख शेख (रा.कळंब, धाराशिव), रोहिणी जाधव, (रा.छत्रपती संभाजीनगर) हे आरोपी फरार आहेत. जामखेडच्या सप्तसूर संस्कृती कला केंद्रातून आरोपींना अटक केली आहे.
मयत पिंकी हनुमंत काटकर ही मूळची रायगड येथील असून जामखेड येथील कला केंद्रात काम करत होती. कला केंद्रातील अंतर्गत वादातून आरोपींकडून मृत तरुणीला बीड येथील मांजरसुंबा येथे मारहाण करण्यात आली. मारहाणीत बेशुद्ध झालेली तरुणी मृत समजून पुरावा नष्ट करण्यासाठी तिला चारचाकी वाहनातून धुळे येथे निर्जन ठिकाणी पेट्रोल टाकून जाळण्यात आले आहे.

Post a Comment