अहिल्यानगर - जुन्नर तालुक्यातील खामुंडी व डुंबरवाडी गावांच्या हद्दीवर अहिल्यानगर–कल्याण महामार्गावर शैक्षणिक सहलीची एसटी बस टायर फुटल्याने मोरीच्या कठड्याला धडकून पलटी झाल्याची घटना १२ फेब्रुवारीला सकाळी ७ वाजता घडली. या अपघातात १४जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपरी शहाली (ता. नेवासा, जि. अहिल्यानगर) येथील विद्यार्थी शैक्षणिक सहलीसाठी एसटी बसने प्रवास करत होते. खामुंडी–डुंबरवाडी दरम्यान टायर फुटल्याने बस महामार्गाच्या कडेला असलेल्या मोरीच्या कठड्याला धडकली व त्यानंतर पलटी झाली.
अपघाताची माहिती मिळताच डुंबरवाडी व खामुंडी येथील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक ग्रामस्थ, तरुण व पोलिसांच्या मदतीने जखमी विद्यार्थ्यांना बाहेर काढून रुग्णवाहिकेतून उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले. या अपघाताची माहिती डुंबरवाडीचे पोलिस पाटील किरण भोर यांनी ओतूर पोलिसांना दिली.
या अपघातात विद्यार्थी तसेच शिक्षक असे १४ जण जखमी झाल्याचे समजते. जखमी विद्यार्थी व शिक्षक यांच्या उपचारासाठी प्रत्येकी एक हजार रुपयांची तातडीची मदत देण्यात आली आहे.
दरम्यान, अपघातानंतर उर्वरित विद्यार्थी व शिक्षकांना धीर देत खामुंडी ग्रामस्थांनी नाष्ट्यासाठी पोहे, तर डुंबरवाडी ग्रामस्थांनी चहा व बिस्किटांची व्यवस्था केली. स्थानिकांच्या तत्परतेमुळे मदतकार्य वेगाने पार पडले असून पुढील तपास ओतूर पोलीस करत आहेत.

Post a Comment