दोघा जिवलग मित्रांचा भीषण अपघातात दुर्दैवी अंत; थरारक अपघात 'सीसीटीव्ही'मध्ये कैद


अहिल्यानगर - अहिल्यानगर–पाथर्डी महामार्गावर करंजीजवळील हॉटेल अपूर्वा समोर बुधवारी (दि. 18) रोजी दुपारी सुमारे 12 वाजता चारचाकी आणि मोटारसायकलची समोरासमोर भीषण धडक होऊन दोन जिवलग मित्रांचा जागीच मृत्यू झाला. ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून अपघाताची तीव्रता पाहून संपूर्ण गाव हादरलं आहे. मृतांची नावं सोमनाथ माणिक पालवे (वय 32) आणि किरण रामकिसन कारखेले (वय 27, रा. त्रिभुवनवाडी, ता. पाथर्डी) अशी आहेत. दोघेही लहानपणापासून जिवलग मित्र असून सामाजिक कार्यात सक्रिय होते आणि दोघेही अविवाहित होते.

तिसगावकडून अहिल्यानगरच्या दिशेने येणारी स्कॉर्पिओ (एमएच 14 बीए 9192) आणि करंजीहून देवराईकडे जाणारी दुचाकी यांची हॉटेल अपूर्वा समोर समोरासमोर जोरदार धडक झाली. धडकेचा आवाज इतका प्रचंड होता की परिसरात क्षणात गोंधळ उडाला. दुचाकीचा अक्षरशः चुराडा झाला. गंभीर जखमी झालेल्या दोघांचा जागीच मृत्यू झाला. अपघातग्रस्त स्कॉर्पिओतील मढी येथील एका महिलेलाही दुखापत झाली आहे.

सीसीटीव्हीत थरारक अपघात कैद

परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये चारचाकी व दुचाकीची समोरासमोर धडक स्पष्टपणे दिसत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. पोलिसांनी संबंधित फुटेज ताब्यात घेतलं असून तपासाला वेग आला आहे. अपघातानंतर पोलीस कर्मचारी अल्ताफ शेख, आबासाहेब अकोलकर, भैय्या बोरुडे, शेखर मोरे आदींसह स्थानिक तरुणांनी तात्काळ मदतकार्य सुरू केले. दोघांना रुग्णवाहिकेतून पाथर्डीला हलवण्यात आलं; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. काही काळ महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती; पोलिसांनी ती सुरळीत केली.

मृत दोन्ही तरुण कष्टाळू आणि मदतीस तत्पर म्हणून ओळखले जात. त्यांच्या अकाली निधनाने त्रिभुवनवाडीसह करंजी परिसरात शोककळा पसरली आहे. विशेष बाब म्हणजे, दोघंही तरुण अविवाहीत होते. दरम्यान, मंगळवारीही पाथर्डी–करंजी–तिसगाव परिसरात अपघाताची घटना घडल्याने महामार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पाथर्डी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

हे ही वाचा ... 

ईशान किशन टी-20 फलंदाज क्रमवारीत टॉप 10 मध्ये पोहोचला 

सुपरस्टार धनुषसोबतच्या लग्नाबाबत मराठी अभिनेत्री स्पष्टच म्हणाली... 

0/Post a Comment/Comments