नगर तालुका (प्रतिनिधी) - घरगुती वापरासाठी महावितरणच्या वीजजोडणीतून अनधिकृतपणे वीज वापरून चोरी केल्याचे तीन स्वतंत्र प्रकार गुंडेगाव (ता. अहिल्यानगर) येथे उघडकीस आले आहेत. या तिन्ही प्रकरणांत एकूण १ हजार २४५ युनिट विजेची चोरी करून महावितरणचे ३१ हजार ७९७ रूपयांचे नुकसान केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात तिघांविरूध्द भारतीय विद्युत अधिनियम २००३ च्या कलम १३५ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
महावितरणच्या वाळकी शाखा कार्यालयातील सहाय्यक अभियंता दत्तात्रय देविदास दसपुते (वय ४३) यांनी यासंदर्भात शनिवारी (२१ नोव्हेंबर) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुंडेगाव येथे २ सप्टेंबर २०२६ रोजी वीजचोरीचे हे तीन प्रकार घडले होते. त्यामध्ये शिवाजी शिवराम वेठेकर याने स्वतःच्या घरासाठी महावितरणची ४१५ युनिट वीज अनधिकृतपणे वापरली. या विजेची किंमत १० हजार ५९९ रूपये असल्याचे फिर्यादीतनमूद आहे.
दुसऱ्या घटनेत रामचंद्र गोविंद वेठेकर याने स्वतःच्या घरासाठी ४१५ युनिट वीज चोरून वापरली. त्याची किंमतही १० हजार ५९९ रूपये आहे. तर तिसऱ्या घटनेत गोरख तुकाराम वेठेकर याने घरगुती वापरासाठी ४१५ युनिट वीज अनधिकृतपणे वापरल्याचे तपासणीत निष्पन्न झाले. या विजेची किंमत १० हजार ५९९ रूपये आहे. या तिन्ही प्रकरणांबाबत महावितरणच्या सहाय्यक अभियंत्यांनी २१ नोव्हेंबर रोजी तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले.

Post a Comment