चांदबिबी महालाजवळ प्रेमी युगुलाला दोघांनी हातोड्याने मारहाण करत लुटले

 


अहिल्यानगर - नगर शहराजवळील चांदबिबी महालाजवळ बारदरी (ता.नगर) जाणाऱ्या रस्त्यावर दोघा अनोळखी लुटारूंनी तरुणावर लोखंडी हातोड्याने जीवघेणा हल्ला करत त्या तरुणाच्या मैत्रिणीच्या हातातील चांदीची अंगठी बळजबरीने हिसकावून नेल्याची घटना १५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास घडली.

आलमगीर, भिंगार येथील २३ वर्षीय फिर्यादी तरुण आणि त्यांची मैत्रीण चांदबिबी महालाजवळील बारदरी गावाकडे जाणाऱ्या मार्गावरून जात असताना हा प्रकार घडला.​दोन अज्ञात आरोपींनी फिर्यादी आणि त्याच्या मैत्रिणीला रस्त्यात अडवले. सायंकाळची वेळ असल्याने रस्ता निर्मनुष्य होता. याचाच फायदा घेत लुटारूंनी फिर्यादीच्या मैत्रिणीच्या हातातील पंधराशे रुपये किमतीची गोल आकाराची चांदीची अंगठी बळजबरीने हिसकावून घेतली.

यावेळी फिर्यादी तरुणाने अंगठी हिसकावण्याचा विरोध केला असता संतापलेल्या दोन्ही आरोपींनी फिर्यादी तरुणाच्या पाठीत व उजव्या डोळ्याखाली लोखंडी हातोड्याने जोरदार प्रहार केले.​या प्राणघातक हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाल्यामुळे त्यांना तातडीने उपचारासाठी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

​जखमी युवकावर रुग्णालयात उपचार झाल्यानंतर त्यांनी १६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी नगर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादी वरून पोलिसांनी तात्काळ दोघा अनोळखी आरोपींच्या विरुद्ध बीएनएस कलम ३०९ (६) प्रमाणे जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला.

​या गुन्ह्याची गंभीर दखल घेत नगर तालुका पोलीस ठाण्याचे स.पो.नि. गणेश वारुळे यांनी तात्काळ पोलीस पथकाला घटनास्थळी पाठवून पंचनामा करण्याच्या सूचना दिल्या तसेच या आरोपींचा तातडीने शोध घेण्याच्याही सूचना दिल्या. त्यानुसार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक उमेश पतंगे करत आहेत.


 

0/Post a Comment/Comments