अहिल्यानगर - लाखाची गुंतवणूक करा आणि दरमहा आठ ते दहा टक्के परतावा मिळवा, अशा आकर्षक आमिषाने श्रीगोंदा तालुक्यात गुंतवणूकदारांची हजारो कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आलेल्या सिस-पे प्रकरणात मुळचा श्रीगोंदा तालुक्यातील रहिवासी व पुणे जिल्ह्यात तलाठी म्हणून कार्यरत असलेल्या एजंटला नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गव्हाणवाडी फाटा (ता.श्रीगोंदा) येथे अटक केली आहे. त्याला श्रीगोंदा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने २७ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दशरथ विठ्ठल रोडे (रा. वडाळी रोड, श्रीगोंदा) असे अटक केलेल्या एजंटचे नाव आहे.
श्रीगोंदा तालुक्यात लाख गुंतवा आणि ’महिन्याला ८ ते १० टक्के परताव्याच्या’ आमिषाखाली गुंतवणूकदारांच्या कोट्यवधींच्या फसवणूक घोटाळ्याचा तपास सध्या वेगात आहे. सीस-पे, इन्फिनिटी, बिकन, ग्लोबल ट्रेडिंग आदी कंपन्यांच्या माध्यमातून अवास्तव आणि हमखास परताव्याचे आमिष दाखवून मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक उभारण्यात आली. सुरुवातीला काही गुंतवणूकदारांना परतावा देऊन विेशास संपादन करण्यात आला. त्यानंतर हजारो गुंतवणूकदारांकडून कोट्यवधी रुपयांचा निधी गोळा करून त्याचा अपहार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात श्रीगोंदा, पारनेरसह राज्यातील विविध पोलीस ठाण्यांध्ये गुन्हे दाखल आहेत.
गुन्हा दाखल होण्यापूर्वीच कंपनीचे सर्व संचालक फरार झाले. या प्रकरणी नितीन अंबादास गांगर्डे (रा मांदळी, ता कर्जत) यांच्या फिर्यादीवरून श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे. पुढे या घोटाळ्याची व्याप्ती वाढल्यावर सदर प्रकरणाचा तपास नगरच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आलेला आहे. पो.नि. शरद गोर्डे हे या घोटाळ्याचा तपास करत आहेत. या प्रकरणात यापूर्वी अनेक एजंटांना अटक झालेली आहे. त्यातील काही जणांना जामीनही मिळालेला आहे. या घोटाळ्यात पुणे जिल्ह्यात कार्यरत असलेला तलाठी दशरथ विठ्ठल रोडे याचे नाव पुढे आले होते. त्यामुळे आर्थिक गुन्हे शाखेच्या वतीने स्थानिक गुन्हे शाखेला आरोपीचा शोध घेण्याकामी कळविण्यात आले होते.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि.संतोष मुटकुळे यांच्या सूचनेनुसार पोलिस अंलदार गणेश लोंढे, रोहित मिसाळ, प्रताप देवकाते, फुरकान शेख यांचे पथक या आरोपीचा शोध घेत होते. २२ ऑक्टोबरला रोजी पथकाला सदर आरोपी गव्हाणवाडी फाटा (ता.श्रीगोंदा) येथे असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे पथकाने तेथे जावून त्याला ताब्यात घेतले व आर्थिक गुन्हे शाखेच्या ताब्यात दिले. आर्थिक गुन्हे शाखेच्यावतीने त्याला २२ ऑक्टोबर रोजी श्रीगोंदा न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला २७ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Post a Comment