अहिल्यानगर- जमिनीच्या वादातून शेतकऱ्याचे घर आणि गोठा जेसीबीने पाडला

 


नगर तालुका (प्रतिनिधी) - नगर तालुक्यातील निंबोडी शिवारात जमिनीच्या कारणावरून बेकायदेशीर जमाव जमवून एका शेतकऱ्याचे राहते घर आणि गोठा जेसीबीच्या सहाय्याने पाडून नुकसान केल्याची घटना ११ फेब्रुवारी रोजी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत बाजीराव माधव जगताप (वय ५८) यांनी फिर्याद दिली आहे. जगताप यांचे निंबोडी येथील कुलाळमळा भागात जुने पत्र्याचे घर आणि गाईंचा गोठा आहे. ११ फेब्रुवारी रोजी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास आरोपी दत्तात्रय हरिभाऊ बेरड, राहुल झेंडे, जेसीबी चालक आणि इतर ३ ते ४ अनोळखी इसम त्या ठिकाणी आले. 'ही जागा त्वरित खाली करा' असे म्हणत त्यांनी जगताप यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

विनाकारण धक्काबुक्की करत आरोपींनी फिर्यादीला जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर आरोपींनी सोबत आणलेल्या जेसीबीच्या साहाय्याने जगताप यांचा गोठा आणि पत्र्याची खोली पाडून टाकली. या घटनेत त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी तातडीने दखल घेत गुन्हा नोंदवला असून अधिक तपास पोलीस हवालदार मिसाळ करत आहेत.

0/Post a Comment/Comments