अहिल्यानगर मध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या घराबाहेर हातात रिव्हॉल्वर घेवून दहशत


अहिल्यानगर - महापालिकेच्या प्रभाग क्र. १ मधील राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवाराच्या घरासमोर आ. संग्राम जगताप यांच्या बॉडीगार्डच्या हातामध्ये रिव्हॉल्वर असलेला व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी हा व्हिडीओ पोस्ट करत अहिल्यानगरमधील भयाण परिस्थिती उघडकीस आणल्याने शहरात खळबळ उडाली आहे. 

महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून, उमेदवारांचा जोरात प्रचार सुरू आहे. निवडून येण्यासाठी अनेक फंडे वापरले जात आहे. समोर तुल्यबळ उमेदवार असला तर साम-दाम-दंड-भेद याचा वापर सुरू असतो. प्रशासन निर्भय वातावरणात निवडणूक पार पाडण्यासाठी प्रयत्न करत असले तरी काही ठिकाणी दादागिरी व गुंडगिरीचा वापर केला जात आहे.

मनपाच्या प्रभाग १ मध्ये काँटे की टक्कर होत आहे. याठिकाणी तिरंगी लढती होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर निवडणूक लढत आहे. त्यांच्याविरोधात शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार रिंगणात आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार रामदास वाणी यांना प्रचार करण्यासाठी घराबाहेर पडू दिले जात नाही. त्यांना घरातच कोंडण्यात आले असून, बाहेर खडा पहारा सुरू आहे. आ. जगताप यांचे स्वीय सहायक व बॉडीगार्ड हे घराबाहेर असून, वाणी यांना बाहेर पडू दिले जात नाही. बॉडीगार्डच्या हातात रिव्हॉल्वर आहे. 

शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी त्यांच्या अकाउंटवरून हा व्हीडीओ शेअर करत नगरमधील निवडणूक कशा पद्धतीने लढविली जात आहे, याची पोलखोल केली आहे. तसेच कारवाईची मागणी केली आहे. त्यांच्या व्हिडीओ नंतर नगरमधील शरद पवार गटाच्या पदाधिकार्‍यांनी थेट पोलीस अधीक्षक कार्यालय गाठून त्यांना घटनेची वास्तविकता दाखवत कारवाईची मागणी केली.

बंदूक दाखवून धमक्या - उमेदवार रामदास वाणी 

प्रभाग एक मधून उमेदवारी लढवत आहे. उमेदवारी ड मधून राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून उमेदवारी आहे. प्रचार करतांना अनेक अडथळे येत आहेत. मुले मागे येतात. गन दाखवतात. उमेदवारी मागे घे, प्रचार करु नका असे सांगितले जात आहे. आज माझ्या प्रापर्टीमध्ये दोन पुलीस व दोन अनोळखी माणसे गेट उघडून ओपन रिव्हाल्वर घेऊन आत येत माझ्या येथील माणसांना धमकावले. त्यामुळे माझ्या येथील माणसे मोबाईल बंद करुन पळून गेले आहेत. अशा प्रकारामुळे लोकशाहीचा गळा आवळण्याचा प्रकार सुरु असल्याची प्रतिक्रीया उमेदवार रामदास वाणी यांनी दिली.


 

0/Post a Comment/Comments