अहिल्यानगर - कृत्रिम बुध्दीमत्ता (एआय) तंत्रज्ञान वापरुन अहिल्यानगर शहर व नगर तालुक्यामध्ये बिबट्याचे अस्तित्व असल्याचे दर्शवुन सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात अफवा पसरविल्या जात असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. त्यामुळे अशा अफवा पसरविणाऱ्यांवर कारवाई करावी असे पत्र वनविभागाने सायबर पोलिसांना दिले आहे.
याबाबत वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी अविनाश तेलोरे यांनी सायबर पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षकांना दिलेल्या पत्रात म्हंटले आहे की, कृत्रिम बुध्दीमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर करुन अहिल्यानगर शहरामधील विविध ठिकाणी व नगर तालुक्यामध्ये बिबट्याचे अस्तित्व असल्याच्या अफवा गेल्या काही दिवसांपासुन विविध प्रकारच्या सोशल मिडीयावर विशेषतः व्हाटसअप व्दारे पसरवुन नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यांत येत आहे. त्यामुळे सदर अफवांमुळे परिसरातील पालकही आपल्या लहान मुलांना शाळेत पाठवित नाहीत.
अशा प्रकारच्या अफवा पसरत असल्या कारणाने नागरिकांचे वनविभागाकडे बिबट्याचा बंदोबस्त करण्याबाबत विविध प्रकारचे अर्ज प्राप्त होत आहेत. सदर प्राप्त अर्जाचे अनुषंगाने संबंधित ठिकाणी जावुन तेथील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता तेथे बिबटयाचा वावर असल्याचे दिसुन आलेले नाही तसेच याठिकाणी फिरस्ती करुन पहाणी केली असता बिबट्याच्या पावलांचे ठसेही दिसुन आलेली नाहीत. त्याचप्रमाणे परिसरातील कोणत्याही व्यक्तीने बिबटयास समक्ष पाहिले असल्याचे स्पष्ट झालेले नाही. फक्त सोशल मिडीयाव्दारे प्राप्त होणाऱ्या अफवा तसेच माहितीवरुन त्यांनी वनविभागाशी अर्जाव्दारे अथवा भ्रमणध्वनीव्दारे संपर्क साधला असल्याचे दिसुन आलेले आहे.
अशा प्रकारे बिबटया संदर्भात अफवा पसरविल्यामुळे व त्याअनुषंगाने या कार्यालयात प्राप्त होणाऱ्या तक्रारीवरुन कार्यवाही करण्याकरिता वनविभागाच्या कर्मचाऱ्यांचा वेळ वाया जात आहे. यामुळे ज्याठिकाणी बिबट्याचा वावर किंवा अस्तित्व असल्याचे निष्पन्न झाले आहे अशा ठिकाणी वनविभागाच्या क्षेत्रिय कर्मचाऱ्यांना तातडीने जावुन कार्यवाही करणे शक्य होत नाही. त्यामुळे अशा प्रवृत्तींना वेळीच आळा घालणे आवश्यक आहे. म्हणून सोशल मिडीया विशेषतः व्हाटसअप व्दारे बिबटया संदर्भात अफवांचा प्रसार करणाऱ्यांविरुध्द प्रचलित नियमानुसार योग्य ती कडक कारवाई तातडीने करण्यात यावी असे या पत्रात म्हंटले आहे.

Post a Comment