अहिल्यानगर - दुकानातील दारू पिण्यासाठी दिली नाही म्हणून एका कामगाराने तरुणावर चाकूने वार करत त्याच्या खुनाचा प्रयत्न केल्याची घटना केडगाव बायपास रोडवर २७ डिसेंबर रोजी रात्री १०.३० च्या सुमारास घडली. या चाकू हल्ल्यात ओंकार घनशाम गवळी (वय २२, रा. काष्टी, ता.श्रीगोंदा) हा जखमी झाला आहे.
याबाबत राजेश रमेश सातपुते (वय ३८, रा. बायपास रोड, केडगाव) यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. जखमी ओंकार गवळी हा त्यांच्या मामाचा मुलगा आहे. फिर्यादी सातपुते यांचे केडगाव बायपास रोडवर वाईन्स शॉप आहे. या दुकानात ओंकार गवळी हा काम पाहतो. दुकानात काम करणारा कामगार नेहूलकुमार प्रमोदकुमार ठाकूर (मूळ रा.समस्तीपूर, बिहार) याने त्यास दुकानातील दारू पिण्यासाठी मागितली.
मात्र ओंकारने ती दिली नाही. याचा त्याला राग आला आणि त्याने ओंकार वर चाकूने वार करत त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला असल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे. या फिर्यादी वरून पोलिसांनी आरोपी नेहूलकुमार याच्या विरुद्ध बीएनएस कलम १०९ (१), ३५२, ३५१ (२) प्रमाणे गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.

Post a Comment