अहिल्यानगर - पुणे जिल्ह्यातील लोणीकंद पोलीस ठाणे हद्दीत पेरणे (ता. हवेली) येथे १ जानेवारी २०२६ रोजी होणार्या जयस्तंभ कार्यक्रमानिमित्त वाहतूक कोंडी व अडथळा होऊ नये याकरिता अहिल्यानगर जिल्हा पोलीस प्रशासनाने अहिल्यानगर- पुणे महामार्गावरील वाहतूक मार्गात ३० तासांसाठी बदल केला आहे.
१ जानेवारी रोजी जयस्तंभ कार्यक्रम होणार असून यावेळी मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी होणार आहे. हा कार्यक्रम अहिल्यानगर-पुणे महामार्गालगत असून कार्यक्रमाकरिता येणार्या नागरीकांमुळे या महामार्गावरील वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच या महामार्गावर प्रचंड प्रमाणात वाहतुकीची वर्दळ असून वाहनांचा कार्यक्रमाकरिता आलेल्या भाविकांना धक्का लागून, अपघात होवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता ३१ डिसेंबर २०२५ रोजीचे रात्री १२ ते २ जानेवारी २०२६ रोजीचे सकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान अहिल्यानगर- पुणे महामार्गावरील बेलवंडी फाटा येथून पुण्याकडे जाणारी वाहतूक तसेच अहिल्यानगरकडून सरळ पुण्याकडे जाणारी सर्व प्रकारच्या वाहतूक मार्गामध्ये खालीलप्रमाणे बदल करण्याचे नियोजित केले आहे.
बेलवंडी फाटा येथून पुण्याकडे जाणार्या वाहतुकीसाठी मार्ग- बेलवंडी फाटा, देव दैठण, धावलगाव, पिंपरी कोळंडर, उक्कडगाव, बेलवंडी, नगर- दौंड महामार्गावरून लोणी व्यंकनाथ, मढे वडगाव, काष्टी, दौंड, सोलापूर, पुणे महामार्गे पुणेकडे. नगर कडून सरळ पुण्याकडे जाणार्या सर्व प्रकारच्या वाहतुकीकरिता पर्यायी मार्ग कायनेटीक चौक/केडगाव बायपास, अरणगाव बायपास, कोळगाव, लोणी व्यंकनाथ, मढे वडगाव, काष्टी, दौंड, सोलापूर, पुणे महामार्गे पुणे कडे. नगरकडून पुणे मार्गे मुंबई, नवी मुंबई, ठाणे कडे जाणार्या सर्व प्रकारच्या वाहतुकीकरिता पर्यायी मार्ग कल्याण बायपास, आळेफाटा, ओतूर, माळशेज, घाट मार्ग असा राहील. या आदेशाचे पालन करून नागरिकांनी पोलीस प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी केले आहे.

Post a Comment