अहिल्यानगर - घरात एकटी असलेली व दोन्ही पायांनी अधू असलेल्या ४० वर्षीय महिलेची अज्ञात इसमांनी चाकूने गळा चिरुन निर्घृण हत्या केल्याची घटना बोल्हेगाव परिसरातील भारत बेकरी रोडवरील कौस्तुभ कॉलनी येथे घडली. सदर घटना १२ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. सौ. मनिषा बाळासाहेब शिंदे (वय ४०) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे.
याबाबत त्यांचे पती बाळासाहेब साहेबराव शिंदे (वय ४६) यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी शिंदे हे त्यांची पत्नी मनिषा व मुलगा अनिकेत यांच्यासमवेत बोल्हेगावच्या कौस्तुभ कॉलनीत राहतात. त्यांचे एमआयडीसीमध्ये फ्रेंडस् इंजिनिअरिंग अॅण्ड वर्क्स कंपनीअंतर्गत आदिराज इंजिनिअरिंग अॅण्ड वर्क नावाचे वर्कशॉप आहे. सदर वर्कशॉप ते व त्यांचा मुलगा पाहतात. तर त्यांच्या पत्नी मनिषा या गृहिणी होत. त्या दोन्ही पायांनी अधू असल्याने घरातून कोठे जात नव्हत्या. १२ डिसेंबर रोजी फिर्यादी शिंदे यांच्या साडूच्या पुतण्याचा साखरपुडा विंचूर (ता.निफाडा, जि. नाशिक) येथे होता. त्यामुळे फिर्यादी व त्यांचा मुलगा अनिकेत हे दोघे सकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास त्यांच्या मोटारसायकलवर साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी गेले होते.
साखरपुडा उरकल्यानंतर ते दोघे त्यांच्या बहिणीची घरी मानोरी (ता.येवला) येथे गेले होते. सायंकाळी ६.३० च्या सुमारास त्यांनी पत्नी मनिषा हिला फोन केला. मात्र तिने फोन उचलला नाही. त्यानंतर त्यांनी त्यांच्या सासर्यांना फोन केला असता त्यांनीही मनिषाने माझा फोन उचलला नाही, असे सांगितले. त्यामुळे फिर्यादी शिंदे यांनी त्यांच्या शेजारी राहणारे विवेक जपे यांना फोन करून माझी पत्नी फोन उचलत नाही, तुम्ही घरी जावून पहाङ्ख, असे सांगितले. जपे त्यांच्या पत्नीला शिंदे यांच्या घरी पाठविले. तिने दरवाजा ठोठावला, पण तो कोणी उघडला नाही, त्यामुळे तिने दरवाजा उघडला असता हॉलमध्ये मनिषा शिंदे या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिसल्या.
ही बाब जपे यांनी शिंदे यांना फोन करून सांगितली. त्यानंतर शिंदे व त्यांचा मुलगा हे येसगाव (ता.कोपरगाव) येथे त्यांच्या सासरी गेले. तेथे घडलेला प्रकार सांगितला व तेथून त्यांच्या भावाला चारचाकी गाडी घेवून बोलावले. त्या गाडीने ते व त्यांचे बंधू व इतर नातेवाईक रात्री १२ वाजण्याच्या दरम्यान बोल्हेगाव येथे पोहोचले. त्यावेळी तेथे पोलिस आलेले होते. तसेच हॉलमध्ये रक्ताचे थारोळे व एक चाकू आणि ब्लेड पान पडलेले दिसले. त्यांना येईपर्यंत पोलिसांनी मनिषा यांचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणलेला होता. तेथे जावून त्यांनी पाहिले असता मनिषा या मृतावस्थेत आढळून आल्या. तसेच त्यांच्या गळ्यावर धारदार शस्त्राचे वार दिसले. त्यानंतर पोलिसांच्या सूचनेनुसार त्यांनी १३ डिसेंबर रोजी पहाटे तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
या फिर्यादीवरुन पोलिसांनी अज्ञात मारेकर्याविरुद्ध बीएनएस कलम १०३ (१), ३३२ (अ) नुसार गुन्हा दाखल केला आहे.

Post a Comment