नगर तालुका (प्रतिनिधी) - चोरट्या मार्गाने घुसखोरी करून भारतात आलेल्या आणि पासपोर्ट नसतानाही नगर तालुक्यातील रुईछ्त्तीसी गावच्या शिवारातील एका हॉटेल मध्ये बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या ५ बांगलादेशी तरुणींना मुंबईच्या काळाचौक युनिट च्या पोलिस पथकाने पकडले असून त्यांना पुढील कारवाई साठी नगर तालुका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
मुंबई काळाचौकी युनिट येथील पोलीस निरीक्षक ज्योती पाटील व पोलिस पथक हे त्यांच्याकडे १ जानेवारी २०२५ रोजी दाखल एका गुन्ह्याच्या तपासासाठी १७ डिसेंबर रोजी सायंकाळी अहिल्यानगर येथे आले होते. ३१ डिसेंबर २०२४ रोजी त्यांच्या युनिटच्या दहशतवाद विरोधी पथकाने मुंबईत एक बांगलादेशी व्यक्ती पकडला होता. याच गुन्ह्याच्या अनुषंगाने सदर पथक नगरला आले. त्यांनी पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांची भेट घेवून तपासकामी मदत मागितली. पोलिस अधिक्षकांनी त्यांच्या सोबत नगरचे पोलिस अधिकारी अंमलदार दिले.
सदर तपासादरम्यान रुईछत्तीशी (ता. नगर) येथील जय हॉटेल येथे छापा टाकला असता सदर ठिकाणी गुन्ह्यातील समाविष्ट व्यक्ती मिळून आली नाही. परंतु सदर ठिकाणी सर्च केले असता पाच बांगलादेशी नागरिक असलेल्या २२ ते २८ वयोगटातील तरुणी मिळून आल्या.
सदर तरुणींची झडती घेतली असता त्यांच्या मोबाईल मध्ये त्यांचे बांगलादेशी नागरिक असल्याचे नागरिकत्व प्रमाणपत्र मिळून आले. त्याबाबत सविस्तर पंचनामा पोलीस निरीक्षक ज्योती पाटील, काळाचौकी युनिट यांनी करून सदर महिलांना पुढील कारवाई करतात नगर तालुका पोलीस स्टेशन यांचे ताब्यात देण्यात आले आहे. सदर बांगलादेशी तरुणी या ७ ते ८ दिवसपूर्वी या हॉटेल मध्ये आल्या होत्या व तेथे वेटरचे काम करत होत्या असे पोलिस तपासात समोर आले आहे. नगर तालुका पोलिसांनी या तरुणींना ताब्यात घेतले असून त्यांना बांगला देशात नेवून सोडण्याची कार्यवाही केली जात आहे.

Post a Comment