अहिल्यानगर - नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रमेश वसंत गांगर्डे (वय ५४, रा. कोंभळी, ता,कर्जत) यांचे २४ डिसेंबर रोजी सकाळी पुणे येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असताना निधन झाले आहे. त्यांचा २० डिसेंबर रोजी रात्री अपघात झाला होता. यात ते गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर पुण्यात उपचार सुरु होते.
स.फौ. गांगर्डे हे २ दिवस पत्नी, मुलगा व मुलगी यांच्या समवेत त्यांच्या मारुती सुझुकी कंपनीच्या ब्रिझा कारने जेजुरी, पंढरपूर, अक्कलकोट, गाणगापूर, तुळजापूर येथे देवदर्शनासाठी गेले होते. तेथून परतत असताना २० डिसेंबर रोजी मध्यरात्री जामखेड तालुक्यातील खर्डा गावाजवळ त्यांच्या कारला समोरून आलेल्या अज्ञात वाहनाने हुल दिल्याने त्यांची कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळली. या अपघातात त्यांना व त्यांच्या पत्नीला गंभीर दुखापत झाली. तर मुलांना किरकोळ जखमा झाल्या होत्या.
त्या दोघांना प्रथम नगरमधील साईदीप हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले होते. मात्र रमेश गांगर्डे यांच्या तोंडाला आणि डोक्याला जास्त मार लागलेला असल्याने त्यांना डॉक्टरांच्या सल्ल्याने पुढील उपचार करण्यासाठी रुबी हॉल पुणे येथे पाठविण्यात आले होते. तेथे उपचार सुरू असताना २४ डिसेंबर रोजी सकाळी त्यांचे दुःखद निधन झाले आहे. त्यांचा अंत्यविधी त्यांची मूळ गाव कोंभळी, ता.कर्जत येथे दुपारी करण्यात आला.
स.फौ. गांगर्डे यांनी जिल्हा पोलिस दलात कोतवाली, पारनेर, नगर तालुका, तोफखाना या ठिकाणी काम केले. त्यांच्या कामाची दखल घेत पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी स्थानिक गुन्हे शाखेत नव्याने नेमणुका करताना त्यांची निवड केली होती. त्यांच्या पश्चात पत्नी, १ मुलगा, १ मुलगी, वडील, २ भाऊ असा परिवार आहे.

Post a Comment