अहिल्यानगर - अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी शनीशिंगणापूर मार्गावर भीषण अपघाताची घटना उघडकीस आली. उंबेरे गावाजवळ रिक्षा आणि मिनी बसची समोरासमोर धडक झाली. या धडकेत इगतपुरीजवळील गिरणारे येथील तीन तरूणांचा जागीच मृत्यू झाला. तर, दोन्ही वाहनांचे प्रचंड नुकसान झाले. तर, इतर दोघे जण गंभीर जखमी असल्याची माहिती समोर आली आहे. काही तरूण पालखी घेऊन शिर्डीला गेले होते. तर, त्यातील काही तरूण दर्शनासाठी शनीशिंगणापूरला दर्शनासाठी जात होते. दरम्यान, राहुरीजवळ समोरून येणाऱ्या मिनी बसची रिक्षाला धडक बसली. यात दोन्ही वाहनांचा चक्काचूर झाला. तर, मिनी बस रस्त्याच्या कडेला उलटली.
प्राथमिक माहितीनुसार, इगतपूरीजवळील गिरणारे येथील काही तरूण पालखी घेऊन शिर्डीला जात होते. तर, त्यातील काही तरूण शनिशिंगणापूरला निघाले होते. तिघेही रिक्षाने निघाले होते. परंतु, दर्शनापूर्वीच त्यांच्यावर काळाने झडप घातली. राहुरीहून समोरून येणाऱ्या मिनी बसने रिक्षा धडक दिली. अपघात घडताच स्थानिक रहिवाशांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच मदतकार्याला सुरूवात केली. या भीषण अपघातात रिक्षातील दीपक जगन डावखर (वय वर्ष २२), आकाश मनोहर डावखर (वय वर्ष 22) आणि दीपक विजय जाधव (वय वर्ष 22) या तिघांचा अपघाती मृत्यू झाला.
स्थानिकांकडून तातडीने मदतकार्य
अपघाताचा आवाज ऐकताच उंबरे परिसरातील स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांनी तातडीने रिक्षामध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढले आणि टेम्पो ट्रॅव्हलरमधील जखमींनाही मदत केली. जखमींना तातडीने रुग्णवाहिकेच्या मदतीने राहुरी आणि अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.
काही काळासाठी वाहतूक विस्कळीत
या भीषण अपघातामुळे शनीशिंगणापूर रोडवरील वाहतूक काही काळासाठी पूर्णपणे विस्कळीत झाली होती. राहुरी पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून घटनेचा पंचनामा केला आणि अपघातग्रस्त वाहने बाजूला सारून वाहतूक पूर्ववत केली.
शनीशिंगणापूर मार्ग बनतोय 'डेथ ट्रॅप'?
गेल्या काही दिवसांपासून शनीशिंगणापूर मार्गावर अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले असून, हा चिंतेचा विषय बनला आहे. भाविकांची आणि जड वाहनांची वर्दळ असलेल्या या रस्त्यावर वेग मर्यादा पाळली जात नसल्याने निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागत आहे. प्रशासनाने या मार्गावर तातडीने सुरक्षिततेच्या उपाययोजना कराव्यात आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी आता नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.

Post a Comment