अहिल्यानगर - केडगाव मधील कोतकर गटाने शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला होता. मात्र ऐन उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी कोतकर गटाने निवडणुकीतूनच माघार घेतली. त्यामुळे केडगावमधील निवडणुकीचे संपुर्ण चित्रच बदलुन गेले.याबाबत कोतकर गटाचे उमेदवारही अनभिज्ञ होते.ऐनवेळी योग्य उमेदवार शोधताना शिवसेनेची चांगलीच दमछाक झाली. निवडणुकीत आघाडीवर असणाऱ्या कोतकरांनी आपली तलवार म्यान का केली याचा उलगडा मात्र होऊ शकला नाही. विधानसभा निवडणुकीच्या वेळीही असेच घडले होते.
केडगावमधील दोन्ही प्रभागातुन ताकदीने लढण्याचा जेष्ठ नेते भानुदास कोतकर यांनी इरादा स्पष्ट केला होता. सुरूवातीला भाजपकडे त्यांनी उमेदवारी मागितली. मात्र भाजपकडुन योग्य प्रतिसाद मिळत नसल्याने कोतकरांनी केडगावात स्वतंत्रपणे आपला पचार सुरू केला होता. दोन्ही प्रभागातुन त्यांचे आठही उमेदवार जवळपास निश्चित झाले होते. भाजपकडुन प्रतिसाद न मिळाल्याने कोतकरांनी ऐनवेळी शिवसेनेशी संपर्क केला. २९ डिसेंबर रोजी सायंकाळी ८ पैकी ६ जागा कोतकर गटाला देण्याचा निर्णय अंतिम झाला.एकमेकांचे विरोधक असणारे भानुदास कोतकर व सेनेचे संपर्क प्रमुख दिलीप सातपुते याच्यात दिलजमाई घडुन येणार होती.
३० डिसेंबर रोजी सकाळी कोतकर गटाच्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. शिवसेनेचे ए बी फॉर्म घेऊन जिल्हाप्रमुख अनिल शिंदे स्वतः केडगाव मध्ये दाखल झाले होते. मात्र दिडच्या सुमारास कोतकरांनी स्वतः शिवसेनेशी संपर्क करीत आम्हाला सेनेकडुन उमेदवारी न करण्याचा निर्णय कळवला.
कोतकरांनी ऐनवेळी नकार दिल्याने शिवसेनेचे पदाधिकारी तोंडघशी पडले.केडगावमधुन ताकदीचे उमेदवार शोधताना दिलीप सातपुते यांची मोठी धावपळ उडाली. शेवटी आठही जागांवर उमेदवारी देण्यात सेना यशस्वी ठरली.
कोतकर गटाचे उमेदवार ही अनभिज्ञ
कोतकर गटातील इच्छुक उमेदवारांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले होते. शिवसेना पक्षाकडुन ही त्यांची अर्ज भरण्याची तयारी सुरू होती. कोतकरांनी शिवसेनेकडुन न लढण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांच्या इच्छुक उमेदवारांनाही माहिती नव्हते. कोतकर गटाच्या सर्व इच्छुक उमेदवारांना या अचानक घडलेल्या घडामोडीने धक्काच बसला.
कोतकर गट आघाडी करून निवडणूक लढवतील अशी चर्चा शेवटचा अर्धा तास आधी सुरू झाली. मात्र इच्छुक उमेदवारांचा उत्साह मावळल्याने कोतकर समर्थक नाराज होऊन केडगाव कार्यालयातुन निघुन गेले. आता कोतकर समर्थकांची आघाडी होईल का की ते निवडनुकीतुन माघार घेतील याबाबतचा अधिकृत निर्णय झाला नाही.
पालकमंत्र्यांशी चर्चेनंतर माघारीचा निर्णय
जेष्ठ नेते भानुदास कोतकर यांनी ३० डिसेंबर रोजी सकाळीच पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांची लोणी येथे भेट घेतली. त्यांच्यात उमेदवारी बाबत बरीच चर्चा झाली. पालकमंत्री विखे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भानुदास कोतकर यांच्यात फोनवरून बोलणे करून दिले. त्यानंतर मात्र कोतकर यांनी लगेच शिवसेनेसोबत न जाण्याचा आणि निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती मिळाली. मात्र या माघारीचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे.

Post a Comment