नगर तालुका (प्रतिनिधी) - नगर तालुक्यातील गुंडेगाव शिवारात घराच्या जागेच्या कारणावरून दोन गटात जोरदार वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत होऊन एका कुटुंबातील पती-पत्नीला लोखंडी गजाने बेदम मारहाण करण्यात आली आहे. याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत जया भरत जगताप यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी आणि आरोपी रेणुका पांडुरंग भोसले, संगिता तुषार भोसले, अमोल भोसले, योगेश भोसले, तुषार भोसले व विनोद (पूर्ण नाव माहीत नाही) यांच्यात गुंडेगाव शिवारातील पाऊतका वस्ती येथील जागेवरून वाद सुरू होता. ४ मे रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास याच कारणावरून आरोपींनी फिर्यादींच्या घरी जाऊन अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वाद वाढल्यानंतर आरोपींनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करत दमदाटी केली.
यावेळी आरोपी तुषार भोसले याने हातातील लोखंडी गजाने फिर्यादी व त्यांच्या पतीवर हल्ला केला. या हल्ल्यात पती-पत्नी दोघेही जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी ६ जणांच्या विरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून सहायक पोलीस निरीक्षक गणेश वारुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार लाड पुढील तपास करत आहेत.

Post a Comment