नगर मध्ये कुख्यात गुन्हेगार टोळीचा धुमाकूळ, तरूणावर तलवार, कोयत्याने वार


अहिल्यानगर - सिध्दार्थनगर परिसरात दहशत माजविणाऱ्या सराईत गुन्हेगार विजु पठारे व त्याच्या साथीदारांनी पुन्हा एकदा धुमाकूळ घालत एका तरूणावर कोयता, तलवार व लाकडी दांडक्याने जीवघेणा हल्ला केल्याची घटना १५ मार्च रोजी दुपारी घडली. या हल्ल्यात अविनाश घोरपडे (रा. सिध्दार्थनगर) हा तरूण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

ही घटना बेंद्रे हॉस्पिटलजवळील झेडपी कॉलनी परिसरातील पाण्याच्या टाकीजवळ घडली. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात विजु राजु पठारे, त्याचा भाऊ अजय राजु पठारे, किरण मोहन जेधिया, सनी रणजीत चावरे, निलेश ससाणे (सर्व रा. सिध्दार्थनगर) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमी अविनाशची आई सुनीता भिवषन घोरपडे ( वय ५४) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित आरोपींनी मागील भांडण मिटविण्याच्या बहाण्याने अविनाश घोरपडे यांना झेडपी कॉलनीतील पाण्याच्या टाकीजवळ बोलावून घेतले. अविनाश तेथे पोहोचताच संशयित आरोपींनी कोणतीही विचारपूस न करता त्याला पाण्याच्या टाकीखाली नेले आणि अचानक हल्ला चढविला. यावेळी संशयित आरोपींनी लोखंडी कोयता, तलवार व लाकडी दांडक्याने अविनाशवर वार केले. या जीवघेण्या हल्ल्यात अविनाश गंभीर जखमी होऊन जमिनीवर कोसळला.

दरम्यान, हा प्रकार पाहून अविनाशचे वडील भिवषण घोरपडे घटनास्थळी धावून आले. मात्र त्यांनाही संशयित आरोपींनी मारहाण केली. मुलावर होत असलेला हल्ला पाहून भिवषण घोरपडे हे जीव वाचविण्यासाठी तेथून पळाले. त्यानंतर देखील संशयित आरोपींनी अविनाशवर पुन्हा हल्ला केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच तोफखाना पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमी अविनाश घोरपडे यांना उपचारासाठी तातडीने जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. हल्ल्यानंतर विजु पठारे व त्याचे साथीदार घटनास्थळावरून पसार झाले असून पोलिसांनी त्यांच्याविरूध्द खूनाचा प्रयत्न, आर्म अॅक्ट आदी कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक मंगेश गोटला करीत आहेत.


 

0/Post a Comment/Comments