अहिल्यानगर (प्रतिनिधी) - मागील काही दिवसापूर्वी झालेल्या भांडणाचा मनाचा राग धरून सहा जणांनी एका तरुणास भर रस्त्यात लाकडी दांडके, दगड व लाथाबुक्क्याने बेदम मारहाण करुन त्याचा खुन केल्याची घटना केडगाव उपनगरातील रेणुका माता मंदिर जवळ शास्त्रीनगर येथे बुधवारी (दि.२४ एप्रिल) सायंकाळी ६ वाजता घडली. विपुल छोट्या काळे (वय ३०, देवी मंदिरापाठीमागे, शास्त्रीनगर, केडगाव) असे मयताचे नाव आहे.
याबाबत कोतवाली पोलीस ठाण्यात मयताची आई शास्त्री छोट्या काळे (वय ६०, रा. देवी मंदिरा पाठीमागे शास्त्रीनगर, केडगाव ) यांनी फिर्याद दिली आहे. या फिर्यादीत म्हटले आहे की त्यांचा मुलगा विपुल काळे याचे मागील काही दिवसांपूर्वी सुरेश जाटला काळे, संदीप ढोल्या चव्हाण, कुणाल सुरेश काळे,(तिघे रा. दूध सागर सोसायटी, केडगाव), चाईन फायर काळे, दारुचंद फादर चव्हाण व सुंदर नितीन काळे (तिघे रा. साठे वस्ती, शेंडी, ता. नगर ) यांच्यासोबत फिर्यादीची मुलगी लसी चव्हाण हिला नांदवण्याच्या कारणावरुन वादविवाद झाले होते.
२४ एप्रिल रोजी सायंकाळी विपुल काळे हा त्याची बहीण मीना चव्हाण, लसी चव्हाण व दुर्गेश चव्हाण असे भाजीपाला आणण्यासाठी केडगाव देवी रस्त्यावर गेले होते. त्यावेळी सुरेश काळे, संदीप चव्हाण, कुणाल काळे, चाईन काळे, दारूचंद चव्हाण, सुंदर काळे यांनी विपुल काळे यास रस्त्यात अडवून मागील वादाच्या कारणावरुन लाकडी दांडके, दगड व लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. याबाबत दुर्गेश चव्हाण यांनी घरी जाऊन शास्त्री काळे यांना सांगितल्याने त्या ताबडतोब घटनास्थळी गेल्या असता विपुल हा रक्तभंबाळ अवस्थेत पडलेला दिसला. त्यावेळी त्याला मारहाण करणारे तेथून पळून गेले. शास्त्री काळे यांनी विपुल यास जिल्हा शासकीय रुग्णालयात औषध उपचाराकरिता नेले असता तेथील डॉक्टरांनी त्यास तपासून तो उपचार करण्यापूर्वीच मयत झाला असल्याचे घोषित केले.
याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी शास्त्री काळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन सुरेश काळे, संदीप चव्हाण, कुणाल काळे, चाईन काळे, दारूचंद चव्हाण, सुंदर काळे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०३ (१) १८९ (२) १९० प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रताप दराडे हे करीत आहे.
Post a Comment