नगर तालुका (प्रतिनिधी) - एमआयडीसी पोलीस तसेच अन्न व औषध प्रशासन विभागाने संयुक्त कारवाई करून तंबाखूजन्य पदार्थाची विक्री करणाऱ्या चौघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडील २ लाख ७६ हजार ८०० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई नगर तालुक्यातील निंबळक येथे १२ फेब्रुवारीला रात्री करण्यात आली आहे.
एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांना निंबळक मध्ये तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यांनी कारवाई साठी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाला बोलावून घेत त्यांचे बरोबर निंबळक येथील गजानन पान स्टॉल येथे छापा टाकला.तेथे राजेंद्र शामराव वराट (वय-४२, रा.निंबळक ता.नगर), अमोल धोंडीराम इंगोले (वय २३, रा. घाटसांगवी ता.जि.बीड. हल्ली रा.निंबळक ता.नगर )असे मावा व सुंगधी तंबाखुची विनापरवाना विक्री करताना मिळुन आले. त्यांना विचारणा केली असता ते मालक व कामगार असल्याचे सांगीतले. पोलिसांनी पान स्टॉल मध्ये झडती घेतली असता १२ हजार ३०० रुपये किमतीचा मावा, विमल पानमसाला, सुंगधी तंबाखु मिळुन आली.
इतर मुद्देमाल साठा कोठे ठेवला याबाबत विचारणा केली असता राजेंद्र वराट यांनी सांगीतले की, त्यांचे नातेवाईक आनंद खैरे यांचे घरात इतर मुद्देमाल लपवुन ठेवला आहे. त्यावरुन खैरे यांचे घराची झडती घेतली असता तेथे आनंद तात्या खैरे (वय २८, रा.निंबळक ता. नगर) व महेश भिमराव घोलप (वय-३२ रा.निंबळक ता. नगर ) मिळुन आले. त्यांचे ताब्यात सुंगधी तंबाखु व मावा, पानामसाला मिळुन आला. त्यामुळे राजेंद्र शामराव वराट, आनंद तात्या खैरे, अमोल धोंडीराम इंगोले महेश भिमराव घोलप या चौघांना ताब्यात घेवून त्यांच्या कडून तयार मावा, सुंगधी तंबाखु, तसेच मावा तयार करण्याची साधने असा एकुण २ लाख ७६ हजार ८०० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम २२३, २७४, २७५,१२३ (३) (५) सह अन्न सुरक्षा अधिनियम कलम ५९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
ही कारवाई स.पो.नि. निरीक्षक माणिक चौधरी, पोलीस उपनिरीक्षक विनोद परदेशी, पोलीस अंमलदार राजु सुद्रिक, नितीन उगलमुगले, साबीर शेख, नंदकिशोर सांगळे, कावरे, महिला पोलीस अंमलदार सुर्यवंशी, पोलीस अंमलदार बोरुडे, किशोर जाधव, नवनाथ दहिफळे, शेरकर तसेच अन्न व औषध प्रशासन विभागाचे अन्नसुरक्षा अधिकारी राजेश बडे, शुभम भस्मे, सागर सोनार यांचे पथकाने केली आहे.
Post a Comment