अहिल्यानगर (प्रतिनिधी) - नगर शहरातील बुरूडगाव रस्त्यावरील साईनगर येथे एका व्यापाऱ्याच्या घरावर सशस्र दरोडा टाकण्यासाठी ५ दरोडेखोर आले. मात्र त्यांची चाहूल लागल्याने कुटुंबीय जागे होत त्यांनी तसेच परिसरातील नागरिकांनी आरडाओरडा केल्याने हे दरोडेखोर अंधारात पळून गेल्याची घटना २२ मार्चला पहाटे ३ च्या सुमारास घडली. पळून गेलेल्या दरोडेखोरांची विना क्रमांकाची मारुती इको कार नागरिकांच्या हाती लागली असून त्यांनी ती पोलिसांच्या ताब्यात दिली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की साईनगर येथे राहणारे योगेश श्रीकांत चंगेडीया यांच्या बंगल्यात दरोडा टाकण्यासाठी २२ मार्चला पहाटे ३ च्या सुमारास ५ दरोडेखोर आले होते. त्यांच्याकडे चाकू, लोखंडी गज, टामी, कटर सारखी हत्यारे होती. बंगल्याची सुमारे १० फुट उंच असलेल्या संरक्षक भिंतीवरून उड्या मारून या दरोडेखोरांनी बंगल्याच्या आवारात प्रवेश केला. सर्वांनी हुडी असलेले शर्ट घातलेले होते. तोंडाला मास्क बांधलेले होते. सर्वांच्या हातात हातमोजे आणि पायात स्पोर्ट्सचे शूज होते.
हे दरोडेखोर बंगल्याच्या आवारात कानोसा घेत वावरत असताना कशाचा तरी आवाज होवून त्यांची चाहूल लागून चंगेडीया कुटुंबीय झोपेतून जागे झाले. त्यांनी सीसीटीव्हीत पाहिले असता त्यांना बंगल्याच्या आवारात दरोडेखोर वावरताना दिसले.त्यामुळे ते अगोदरप्रचंड घाबरले. त्यांनी शेजारी राहणाऱ्या काहींना फोन करून चोरटे आल्याची माहिती दिली. काहीवेळातच परिसरातील अनेकजण जागे झाले आणि त्यांनी सर्वांनी एकाच वेळी चोर चोर असा आरडा ओरडा सुरु केला. सर्व बाजूने झालेला आरडा ओरडा ऐकूण दरोडखोर बंगल्याच्या पाठीमागील बाजूच्या संरक्षक भिंतीवरून उड्या मारून अंधारात पसार झाले.
चोरट्यांच्या कार मध्ये सापडली हत्यारे
हे दरोडेखोर एका विनाक्रमांकाच्या मारुती इको कार मधून आले होते. ती कार त्यांनी बंगल्याच्या पाठीमागील बाजूस अंधारात उभी केलेली होती. मात्र पळून जाताना त्यांनी कार तेथेच सोडून दिली. काही वेळाने नागरिक बाहेर आले तेंव्हा सदर कार त्यांच्या निदर्शनास आली. या कारची पाहणी केली असता त्यात दरोड्यासाठीची काही हत्यारे आढळून आली. थोड्या वेळाने पोलिस आल्यानंतर ती कार पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली आहे.
Post a Comment